(३)
नुकताच शहर समितीची बैठक पार पडली. ही बैठक निवडणुकीच्या पराभवानंतरची चिंतन बैठक होती की औपचारिक बैठक हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. या बैठकीला चिंतन बैठक म्हंटल तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची कारणमीमांसा झालेली कुठेच पहावयास मिळत नाही. किंवा या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. यातूनही कार्यकर्त्यातून कोणी विचारणा केलीच तर मागील गोष्टी काढू नका पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा असे उपदेशाचे डोस समिती नेते कार्यकर्त्यांना देतात. लोकसभेत समितीला यश येणार नाही हे माहीत असून देखील समितीचे मतदान अबाधीत ठेवण्यासाठीच समितीने लोकसभा निवडणूक लढविली पाहिजे असा सूर कार्यकर्त्यातून आला. त्यामुळेच समितीने लोकसभा लढविण्याचे जाहीर केले. मात्र निवडणुकीचे नियोजन ज्या पद्धतीने होणे गरजेचे होते तसे झाले नाही. उमेदवार जाहीर झाल्यानंतर पुढील नियोजन हे समिती नेत्यांच्या सल्ल्यानुसार होणे अपेक्षित होते परंतु नियोजनाची सर्वच सूत्रे “सेटलमेंट चौकडी”ने आपल्या हातात घेतली आणि प्रचाराचे नियोजन करण्याऐवजी ही “सेटलमेंट चौकडी” राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराकडून आर्थिक व्यवहाराचे नियोजन करण्यात मग्न झाली. “सेटलमेंट चौकडी”ने वेगवेगळ्या प्रकारचे प्रसार, प्रचार आणि प्रसिद्धीसाठी “कोटेशन” मागविले आणि आपण किती समितीशी प्रामाणिक आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याचदरम्यान दूरध्वनीवरून “सेटलमेंट चौकडी”चे राष्ट्रीय पक्षाशी संपर्क वाढले आणि चक्क या “सेटलमेंट चौकडी”ने प्रचार, प्रसार व प्रसिद्धीचे “कोटेशन” देऊ केले. यामध्ये अर्ज दाखल करण्यासाठीच्या शक्तीप्रदर्शनापासून ते नेत्यांच्या सभा, शहरात काढली जाणारी बाईक रॅलीला येणाऱ्या खर्चापर्यंत तसेच टेबल लावण्यासाठीचे देखील “कोटेशन” राष्ट्रीय पक्षाला देण्यात आले आणि आपला स्वार्थ साध्य केला, अशी चर्चा समितीनिष्ठ कार्यकर्त्यांतून दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.