बेनकनहळ्ळी ग्रामस्थांचा तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा
बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीतून स्वतःहून माघार घेत नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी; अन्यथा नव्या कार्यकारिणीत सहभागी होणार नाही, असा इशारा बेनकनहळ्ळी ग्रामस्थांनी तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
संघटना बळकटीबाबत चर्चा करण्यासाठी बेनकनहळ्ळीतील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांची शनिवारी (दि. ६) रात्री महालक्ष्मी मंदिरात बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून तालुका समितीचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ लोक कार्यकारिणी निवडण्यासाठी गावोगावी बैठका घेत आहेत. या विषयावर अनेकांनी मत व्यक्त केले.
तालुक्यात म. ए. समितीला पुन्हा बळकटी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी संघटनेसाठी थोडी माघार घ्यावी. स्वतःहून संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे. समिती संघटनेच्या कार्यकारिणीसाठी गावोगावी बैठका घेत आहेत त्यात युवकांचा सहभाग दिसून येत नाही. या साऱ्या बाबींचा पदाधिकाऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन करण्यात आले. बैठकीत तालुका म. ए. समिती बळकट करायची असेल तर पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून थोडी माघार घेऊन मार्गदर्शक म्हणून काम करावे. ही आमची मागणी मान्य नसेल तर आम्ही कार्यकारिणीत सहभागी होणार नाही. गाव पातळीवर आमची आम्ही संघटना बळकट करू, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला भरमा देसूरकर, आनंद जाधव, युवराज पाटील, मारुती पाटील, भरमा पाटील, संतोष मंडलिक, जोतिबा जाधव, सुनील खांडेकर, नारायण पाटील, प्रवीण चौगुले, चंद्रकांत पाटील, जोतिबा देसूरकर, दीपक देसूरकर, यल्लाप्पा देसूरकर आदी उपस्थित होते.
१५ जणांची निवड
तालुका समिती कार्यकारिणीत काम करण्यासाठी बेनकनहळ्ळीतील समिती कार्यकर्त्यांनी बैठकीत १५ कार्यकर्त्यांची नावे निवडली आहेत. त्यात रामा पाटील, आनंद पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मण खांडेकर, मारुती पाटील, शंकर पाटील, राजू देसूरकर, परशराम म. पाटील, मोहन कांबळे, प्रवीण देसूरकर, गजानन देसूरकर, विठ्ठल पाटील, प्रमोद लाड आणि सुनील खांडेकर यांचा समावेश आहे.