बेळगाव : सागर शिक्षण (बी.एड्.) महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी विविध सुमधूर प्रार्थना गीते, भजने, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेगीते, देशभक्तीगीते उत्कृष्टपणे प्रस्तुत करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली.
कार्यक्रमाची सुरूवात प्रशिक्षणार्थींच्या सुमधूर प्रार्थनेने झाली. प्रा. एस. पी. नंदगाव यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य आर. व्ही. हलब यांनी गुरू-शिष्य परंपरेचा महिमा सांगितला. संगीत प्रा. विनायक मोरे यांनी संगीताचे महत्त्व विशद केले. त्यानंतर बीएड प्रशिक्षणार्थींनी विविधढंगी मराठी, हिंदी, कन्नड बहारदार गीते सुश्राव्यपणे गाऊन सर्वांना मोहित केले.
श्रृति सरमळकर, क्रिस्तिना कलेबार, शिवानी मडकईकर, जान्हवी पेंडसे, कुंदन नाईक, तृप्ती भोसले, प्रियंका गुरव, आशाराणी पोतदार, विद्या सुर्यवंशी, शुभांगी पिळणकर, ऋतुजा झाजरी, सुष्मा कुरणी, मल्लिकार्जुन नायक यांनी वैयक्तीक गीतांचे सुंदर सादरीकरण केले. त्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन खास गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी समूहगीतांचेही उत्कृष्टपणे प्रस्तुतीकरण केले. निलिमा गावडे आणि अंजना के. यांनी आपली मते मांडली. प्रा. कल्पना धामणेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.