बेळगाव : “नाना शंकर शेठ सारखी अनेक रत्ने जन्माला येतात तेव्हा समाजाचा उद्धार होतो, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे जीवन कार्य या तरुण पिढीला समजण्याची गरज आहे त्याकरिता “पृथ्वीपती” हे नानांचे चरित्र असलेले पुस्तक या पिढीच्या हाती देण्याची जबाबदारी पालकांची आहे” असे विचार प्रख्यात अभिनेते प्रसाद पंडित यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. त्या कार्यक्रमास श्री पंडित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर पाहुणे म्हणून जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सराफ अशोक वेसनेकर, सराफ अनिल मोदगेकर, डॉ. विनोद गायकवाड, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. धारवाड रोडवरील जयवंती मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद वेर्णेकर हे होते.
आपल्या भाषणात प्रसाद पंडित पुढे म्हणाले की “नानांचे कार्य एवढे उच्च आहे की त्यांना भारत सरकारने भारतरत्न ऐवजी भारत कौस्तुभमणी असा मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करावा.”
याप्रसंगी बोलताना डॉ. विनोद गायकवाड यांनी दैवज्ञ ब्राह्मण शिक्षण संस्थेचे आणि सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे कार्य उत्तमरितीने चालले आहे असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यावेळी बोलताना विठ्ठल शिरोडकर म्हणाले की “नाना शंकर शेठ यांनी ज्या मुंबई विद्यापीठाची स्थापना केली त्या विद्यापीठाला नानांचे नाव दिले जावे आणि भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार बहाल करावा”
प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख आणि सूत्रसंचालन संस्थेच्या सेक्रेटरी सौ. मधुरा शिरोडकर यांनी केले.
350 विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्राविण्य मिळवलेले अनेक विद्यार्थी व नागरिक आणि दैवज्ञ ब्राह्मण समाजातील साठी ओलांडलेल्या अनेक नागरिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दैवज्ञ भगिनी मंडळ, दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ, दैवज्ञ ब्राह्मण भवन निर्मिती समिती आणि सुवर्ण लक्ष्मी सोसायटीचे संचालक व स्टाफ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. समर्थ कारेकर यांनी आभार प्रदर्शन केले. प्रारंभी दीप प्रज्वलन आणि नाना शंकर शेठ यांच्या तैलचित्राचे पूजन प्रसाद पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोहन कारेकर, विजय सांबरेकर, दीपक शिरोडकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, राहुल बेळवटकर, सुधीर कारेकर, मारुतीराव सांबरेकर, दत्ता कारेकर यांच्यासह नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.