बेळगाव : बेळगावात जिल्हास्तरीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अभिनवपणे हेल्मेट जनजागृती केली.
78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर आज बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी बुलेट चालवून, हेल्मेट परिधान करून शहरात हेल्मेट जनजागृती केली. हेल्मेट घातल्याने दुचाकीस्वार अपघाताच्या वेळी स्वत:चे व कुटुंबीयांचे रक्षण करू शकतात, असा संदेश त्यांनी दिला.
त्यानंतर कार्यक्रमात मंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आदी मान्यवरांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी हेल्मेटचे महत्त्व सांगितले.
यावेळी उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा आयुक्त मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग व त्यांची कन्या, वाहतूक पोलीस आदींनी या हेल्मेट जनजागृतीला पाठिंबा दिला. ही जनजागृती रॅली जिल्हा स्टेडियम, कोल्हापूर कृष्णदेवराय सर्कल, राणी चेनम्मा सर्कल, कोर्ट रोड येथून निघून आरटीओ संगोळी रायण्णा सर्कल येथे येऊन समाप्त झाली.