बेळगाव : दिवंगत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले सारे आयुष्य सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक आंदोलने चळवळी केल्या. अन्यायाच्या विरोधात लढून महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखविली. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न संबंधीच्या प्रत्येक लढ्याचे नेतृत्व केले, म्हणूनच त्यांची सीमा चळवळीचे ‘भीष्माचार्य’ अशी ओळख होती, असे विचार वाई (सातारा) येथील सेवानिवृत्त प्राचार्य एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) गावामध्ये येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज रविवारी आयोजित दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या शोकसभेप्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते. प्रारंभी दोन मिनिटे मौन पाळून भाई एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
समितीचे सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी 8 फेब्रुवारी 1960 साली भाई एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या साराबंदी लढ्याची माहिती दिली आणि एन. डी पाटील यांच्या विचारांची लढाई येळ्ळूरवासीय पुढे नेतील अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, नवहिंद सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, आनंद पाटील, माजी ता पं. सदस्य रावजी पाटील, दत्ता उघाडे, शे. का. पक्षाचे जिल्हा चिटणीस विलास घाडी आदींनी आपले विचार मांडले. शोकसभेला येळ्ळूरचे एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, नेताजी सोसायटीचे संचालक सी. एम. गोरल, रघुनाथ मुरकुटे, एम. वाय. घाडी, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, ज्योतिबा चौगुले, रमेश मेणसे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, शुभांगी पाटील, सोनाली येळ्ळूरकर, रूपा पुण्याण्णावर, सुवर्णा बिजगरकर, देवानंद घाडी, चांगदेव कंग्राळकर, शेखर पाटील, गोपाळ शहापूरकर, प्रकाश घाडी, शिवाजी गोरल, दौलत पाटील, राजू पावले, वाय. सी. इंगळे, प्रदीप मुरकुटे, रमेश पाटील, नवहिंदचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, परशुराम कंग्राळकर, नारायण कुंडेकर, जयराम घाडी, परशराम घाडी, मधु पाटील, वाय. एन. पाटील, हणमंत पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दूद्दाप्पा बागेवाडी यांच्या आभार प्रदर्शनाने शोकसभेचा समारोप झाला.