2022 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
येळ्ळूर : शिवाजी रोड येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीमध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, संस्थेचे वकील सागर खन्नूकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, विलास बेडरे, दयानंद उघाडे, राजू डोन्न्यान्नावर, सौ. मनीषा घाडी, समाजसेवक डॉ. तानाजी पावले, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर हणमंत पाटील, लक्ष्मण बेकवाडकर, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे व नेताजी युवा संघटनेचे माजी अध्यक्ष रविंद्र गिंडे उपस्थित होते. प्रारंभी सीमा चळवळीचे सरसेनापती प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. तर दिपप्रज्वलन वकील सागर खन्नूकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, दयानंद उघाडे, प्रमोद पाटील, विलास बेडरे, हणमंत पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना नेताजी सोसायटीचे चेअरमन डी. जी. पाटील म्हणाले, नेताजी सुभाष चंद्र बोस हे एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान फार मोठे होते. भारताच्या स्वातंत्र्याचे खरे वारसदार म्हणजेच नेताजी सुभाष चंद्र बोस होय. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा, अशी घोषणा करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यानी खऱ्याअर्थाने स्वातंत्र्याच्या कुंडात स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांची आज 125 वी जयंती साजरी करताना आमचा ऊर भरून येत आहे. संचालक प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी वकील सागर खन्नूकर, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी नेताजी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. सामाजिक बांधिलकी जपणारी एक चांगली संस्था असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवनपट असलेल्या दिनदर्शिकेचे ही प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे, संचालक भरतकुमार मुरकुटे, संजय मजूकर, सी. एम. उघाडे, किरण गिंडे, मीनाजी नाईक, के. बी. बंडाचे, सौ. अस्मिता पाटील, बी. डी. छत्र्यांन्नावर, सल्लागार गणपती हट्टीकर, के. एन. पाटील, परशराम गिंडे, पांडुरंग घाडी, प्रभाकर कणबरकर ,अनिल पाटील, अनिल मुरकुटे, शंकर मुरकुटे, रविकांत पाटील, दीपक हट्टीकर, चांगदेव मुरकुटे, रवींद्र कणबरकर, विजय धामणेकर यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले. तर भरतकुमार मुरकुटे यांनी शेवटी आभार मानले.