Monday , December 8 2025
Breaking News

कोलकाता येथील “त्या” घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील डॉक्टर रस्त्यावर!

Spread the love

 

बेळगाव : कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात पुकारण्यात आलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी “24 तास काम बंद” आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयएमए बेळगाव, डेंटल असोसिएशन, आयुष संघटना, अभाविप वगैरे विविध संघटनांनी सकाळी शहरात निषेध मोर्चा काढून निवेदन सादर केले. आजच्या या मोर्चात शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) पुकारलेल्या 24 तास काम बंद आंदोलनाला आज बेळगावात वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
यासाठी आयएमए बेळगाव शाखा, आयुष फेडरेशन ऑफ इंडिया बेळगाव शाखा, महिला डॉक्टर्स संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध केला.
यावेळी शिकाऊ डॉक्टरांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून कांही काळ रस्ता रोको केला. चन्नम्मा चौकातील आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. सदर मोर्चात शेकडो डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, सफेद कोटाला लाल होऊ देऊ नका, बऱ्या करणाऱ्या हातांना रक्तरंजित करू नका, त्या महिला डॉक्टरला न्याय मिळालाच पाहिजे, बलात्कार थांबवा, सुरक्षा नाही सेवा नाही, यासारख्या विविध आशयांचे फलक आणि भगवे ध्वज हातात धरून ‘वुई वॉन्ट जस्टीस’ सारख्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोलकाता येथील घटनेस जबाबदार असलेल्याना फाशीची शिक्षा दिली जावी. अत्याचार व खून झालेल्या महिला डॉक्टर आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय दिला जावा. केंद्राने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक कायदा अंमलात आणावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना भारतीय वैद्यकीय संघटना (आयएमए) बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र बी. अनगोळ यांनी कोलकाता येथील हॉस्पिटलमध्ये कामाच्या वेळेत एका महिला पीजी डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना गेल्या 9 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. खुनाच्या घटनेनंतर संबंधित आरोपींनी 14 ऑगस्ट रोजी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दंगा घातला, मात्र त्याकडेही सरकारने दुर्लक्ष करण्यात आले. असे जर घडणार असेल तर डॉक्टर्स विशेष करून महिला डॉक्टर्स आपले कर्तव्य कसे पार पाडणार? त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर अशा एका केंद्रीय कायद्याची गरज आहे. सर्व डॉक्टरांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे अन्यथा त्यांना हॉस्पिटलमध्ये काम करणे अशक्य होईल. कोलकाता येथील घटना सरकारी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. याच्या निषेधार्थ आयएमएने आज सकाळपासून 24 तासासाठी संपूर्ण देशात ओपीडी सेवा बंद ठेवली असली तरी आपत्कालीन सेवा सुरू आहे. आम्ही जशी समाजाची काळजी घेतो तशी सरकारने आमची देखील काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण नसेल तर ते आपले काम व्यवस्थित करू शकणार नाहीत, असे डॉ. अनगोळ यांनी सांगितले.
आयुष फेडरेशन ऑफ इंडिया बेळगाव शाखेचे अध्यक्ष डाॅ. पद्मराज पाटील म्हणाले, भारत सरकार मार्फत त्या मयत महिला डॉक्टरला न्याय दिला जावा. तसेच बलात्कार करून तिचा खून करणाऱ्यांना कठोर शासन केले जावे. आजच्या घडीला डॉक्टरांची कमतरता असून समाजाला त्यांची गरज आहे. ही वस्तुस्थिती असताना डॉक्टरांवरील अन्याय अत्याचार याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणे काळाची गरज आहे. महिला डॉक्टरवरील बलात्काराची ही घटना समाजाला काळीमा फासणारी आहे. महिलांना सुरक्षा नसेल तर त्यांचे जगणे कठीण होईल. सरकार आणि पोलीस प्रशासनाने जर आम्हा डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले नाही तर येत्या काळात डॉक्टरांना सुद्धा स्वतः सोबत शस्त्र बाळगावी लागतील असे सांगून केंद्र सरकारने लवकरात लवकर त्या दुर्दैवी महिला डॉक्टरसह तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा.
आजच्या डॉक्टरांच्या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *