बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमेनजीक कर्नाटक हद्दीत अत्यंत खराब झालेल्या बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संतप्त वाहनचालक आणि नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील शिनोळीजवळ भव्य रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला.
बेळगाव – वेंगुर्ला या रस्त्याची महाराष्ट्र सीमेजवळ कर्नाटक हद्दीत खड्डे पडून वाताहत झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान- मोठे अपघात घडत असून सदर रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील बेळगाव – वेंगुर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष जात केले आहे. अलीकडेच त्रस्त वाहनचालक आणि नागरिकांनी या रस्त्याची २२ ऑगस्टपूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा २३ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला होता. मात्र त्याकडे देखील कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळे संतप्त वाहनचालक व नागरिकांनी शुक्रवारी सकाळी शिनोळीजवळ बेळगाव – वेंगुर्ला रस्ता अडवला. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी ट्रक आडवा उभा करण्याबरोबरच रस्त्यावर ठिय्या मारून रास्ता रोको सुरू केला. ‘रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’ या घोषणेसह कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुरू झालेल्या या रस्ता रोकोमुळे सदर मार्गावरील वाहतूक कांही तास ठप्प झाली होती.
Belgaum Varta Belgaum Varta