Friday , December 12 2025
Breaking News

सावकारी धंद्याचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सहकारी सोसायट्यांचा जन्म : डॉ. सुनील नागावकर

Spread the love

 

धनश्री सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा शुभारंभ थाटात

बेळगाव : धनश्री पतसंस्थेने स्वतःची प्रगती साधत समाजातील लोकांचा विश्वास संपादन करून, लोकांची सेवा करणारी एक उत्तम सहकारी संस्था म्हणून नाव कमावले आहे. त्याचबरोबर पतसंस्थांनी व्यावसायिक व्यवस्थापन करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जोखीम कमी करून व्यावसायिक व्यवस्थापन केल्यास संस्थेची प्रगती होते, पतसंस्था टिकल्या तरच सामान्य माणूस उभा राहू शकणार आहे. संस्थेकडे लिक्विडिटीचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असून छोट्या लोकांना जास्तीत जास्त कर्ज दिले पाहिजेत. ठेवीच्या रक्कमेलाही सुरक्षितता मिळाली पाहिजेत. सावकारी धंद्याचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सहकारी सोसायट्यांचा जन्म झाला आहे. असे विचार डॉ. सुनील नागावकर यांनी काढले, ते धनश्री सोसायटीच्या प्रधान कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. धनश्री सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, डॉ. सुनील नागावकर, सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी पावले, उपाध्यक्ष नितीन येतोजी, संचालक संजीव जोशी, गोपाळ होनगेकर, गोपाळ गुरव, जगदीश बिर्जे, अप्पाजी पाटील, अर्जुन कोलकार, संचालिका सोनल खांडेकर, सविता मोरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. दीप प्रज्वलन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते झाले, तर माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संचालिका सोनल खांडेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संचालक संजीव जोशी यांनी करून दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पावले यांनी सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील एक सुसज्ज सोसायटी म्हणून धनश्रीकडे पाहिले जाते. धनश्री सोसायटीच्या संचालकांचे त्यांनी कौतुक केले, सहकार क्षेत्रात अगदी उत्तमरीतीने ही मंडळी काम करत आहेत. त्याचबरोबर भविष्यात मोठमोठ्या इंडस्ट्रीज बेळगाव आणण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार महांतेश कवटगीमठ बोलताना म्हणाले, धनश्रीने सुरू केलेली सहकार चळवळ वाखाणण्यासारखी आहे. पतसंस्थेने सामान्य लोकांच्या गरजाना हातभार लावला आहे. या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे, ही सोसायटी नाही, तर ही एक राष्ट्रीयकृत बँकच आहे. संस्थाचालकानी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा उपयोग सामान्यासाठी करावा, असे सांगितले. यावेळी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व वैयक्तिकरित्या धनश्रीच्या संचालक मंडळाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी संचालिका सविता मोरे, सचिव नागेंद्र तरळे, बी ओ. येतोजी, राजेंद्र मुतगेकर, रावजी पाटील, अमर अकणोजी, नेमिनाथ कंग्राळकर, अनंत लाड, रघुनाथ मुरकुटे यांच्यासह भागधारक,सभासद, हितचिंतक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. संचालक जगदीश बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक आप्पाजी पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती कार्यकर्त्यांचे जाहीर आभार

Spread the love  बेळगाव : दिनांक आठ डिसेंबर 2025 रोजी कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    हंअंअंअं एके काळी, ट्रष्टी लोकांनी जनतेचा पैसा लोटून सहकारी संस्था मोड़ते काढल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *