बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंदिर येथे दुपारी चार वाजता जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील व दिनेश ओऊळकर यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी स्वागत समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अर्जुनराव घोरपडे यांच्या जीवनकार्याची माहिती देताना निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे म्हणाले, अर्जुनराव घोरपडे हे शेतकरी कुटुंबातील होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. तसेच व्यवसायात जम बसविल्यानंतर सहकाराच्या क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य केले. मराठा बँकेची धुरा अनेक वर्ष सांभाळल्यानंतर त्यांनी कर्नाटक राज्यातील पहिली जिजामाता महिला बँक स्थापन केली. मराठा मंदिर उभारण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले.
मराठा मंदिराचे दीड कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. याचवेळी सहकार सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या अर्जुनराव घोरपडे यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. जन्मशताब्दी सोहळा आणि मराठा मंदिर नूतनीकरण कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अर्जुनराव घोरपडे यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह माजी मंत्री जयंत पाटील तसेच निवृत्त सहकार व पणन अधिकारी दिनेश ओऊळकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील असणार आहेत.