बेळगाव : कै. अशोकराव मोदगेकर यांनी बेळगावच्या पूर्व भागात मराठी भाषा व मराठी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. मराठी शाळा स्थापन करून शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले, हे त्यांचे मराठी भाषेबद्दल असलेले निसिम प्रेम भावी समाजाला प्रेरणादायी आहे, असे विचार बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले. रणझुंझार शिक्षण संस्थेच्यावतीने कै. अशोकराव मोदगेकर यांचा चतुर्थ स्मृतिदिन पाळण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल बसवंत पाटील होते तर व्यासपीठावर माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. रामचंद्र मोदगेकर, श्री. निखिल मोदगेकर आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता अक्षीमनी यांनी प्रास्ताविक केले. रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी श्री. मालोजी अष्टेकर यांच्या शुभहस्ते कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनीही आदरांजली वाहिली.
कै. अशोकराव मोदगेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तर त्या विजेत्यांना श्री. मालोजी अष्टेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले
कै. अशोकराव यांचा पिंड समाजकार्याचा असल्याकारणाने ते नेहमी समाजासाठी धडपडायचे व सगळ्यांना विश्वासात घेऊन कार्य करण्याची त्यांची पद्धत वाखणण्याजोगी होती, असे माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. रामचंद्र मोदगेकर म्हणाले.
माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला चेअरमन पदाची धुरा सांभाळण्याचे धाडस निर्माण करणे हा फार मोठा विश्वास आहे आणि असा विश्वास दाखवणे हे त्यांनाच जमत होते असे श्री. विठ्ठल पाटील म्हणाले.
गावामध्ये अनेक विधायक कार्य करीत असताना युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम वेळोवेळी त्यांनी केले असे विचार श्री. रमेश मोदगेकर यांनी व्यक्त केले तर त्यांचे चिरंजीव श्री निखिल मोदगेकर यांनी “कर्तव्यसाठी मी आणि श्रेयासाठी आपण” या वडिलांच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मी हे शैक्षणिक, सहकार व सामाजिक कार्य पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहीन व आपण सर्वजण मला साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला श्री. मारुती गाडेकर, श्री. परशराम मल्लाणाचे, श्री. धुळाप्पा मोदगेकर, श्री. गुंडू पाटील, श्री. कल्लाप्पा कोलकार, श्री. भाऊसाहेब मोदगेकर, श्री. यल्लाप्पा मोदगेकर, श्री. सिद्राय वर्पे, श्री. प्रकाश धानगावडे, श्री अमर मोदगेकर, श्री. संतोष पाटील, सौ. प्रिया पाटील, कु. तेजस्वी मोदगेकर, श्री. बाळू मुकूंद, श्री. सिध्दाप्पा जत्राटी, श्री. कपिल पाटील, मुख्याध्यापक वाय. पी. पावले आदी उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका सरिता देसाई तर आभार प्रदर्शन शिक्षक नारायण आपटेकर यांनी मानले.