बेळगाव : एकीकडे प्रशासन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवर निर्बंध घालत असतानाच माळी गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने चिंचेच्या बियांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून समाजाला वेगळा असा संदेश दिला आहे.
माळी गल्ली येथील गणेशोत्सव मंडळ हे दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देत असते. मागील वर्षी देखील या मंडळाने रूद्राक्ष वापरून श्रीमुर्ती साकारली होती. या वर्षी या मंडळाने चिंचेच्या बियांसोबतच जुने वृत्तपत्र, कागदी पुठ्ठे तसेच खादी कापड याच्या लगद्यापासून सदर मूर्ती साकारली आहे. सदर गणेशमूर्ती साकारण्यासाठी 2 लाख 21 हजार 111 चिंचोक्यांचा वापर करण्यात आला असून ही मूर्ती साकारण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागला आहे. सदर श्रीमुर्ती गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी साकारली असून ते एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती बनविणारे मूर्तिकार म्हणून परिचित आहेत.