बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती – शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका संज्योत बांदेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व विद्यार्थ्यांना डॉ. राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गांची जबाबदारी दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. प्रसाद मोळेरखी आणि यश गुगरट्टी यांनी मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळली होती.
यानंतर शिक्षकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, शब्दकोडे सोडवणे, अंताक्षरी, गाण्याच्या भेंड्या आणि शारीरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. गटवार घेतलेल्या विविध मनोरंजनात्मक खेळामधून अनुक्रमे चार गटांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व शिक्षकांसाठीही शाळेकडून भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे परीक्षण बी.बी. शिंदे, प्रतापसिंह चव्हाण, डी. एस. मुतकेकर व शितल बडमंजी यांनी केले तर शिक्षक दिनानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाचे नेटके नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्नेहल पोटे व शैला पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक नारायण उडकेकर व शिक्षण संयोजक नीला आपटे, सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार माधुरी पाटील यांनी मानले.