बेळगाव : पाचव्या दिवशीच्या घरगुती गणेशमूर्तीचे आज बुधवारी विसर्जन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. त्यामुळे महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. शहरात यंदा शनिवारी ७ रोजी गणेशमूर्तीचे उत्साहात आगमन झाले होते. त्यानंतर काही जणांनी दीड दिवसाच्या गणपतीला निरोप दिला होता. मंगळागौर झाल्यानंतर पाचव्या दिवशी घरगुती विसर्जन करण्याची परंपरा असलेले भक्तानी बाप्पाला निरोप दिला. मनपातर्फे शहरात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने कपिलेश्वर मंदिरजवळील दोन्ही तलाव, रामतीर्थ तलाव (जक्कीन होंडा), जुने बेळगाव येथील तलाव व इतर ठिकाणी असलेल्या तलावात पाणी भरण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आज बुधवारी पाचव्या दिवशी विसर्जनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विसर्जन तलावाबरोबरच महापालिका, बुडा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फेही ठिकठिकाणी विसर्जन करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. अन्य ठिकाणीही हौद्यात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची सोय उत्तमरीत्या करण्यात आली होती. विसर्जन तलावांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अडचण निर्माण होऊ याकरिता बुधवारी सकाळपासूनच पोलिस अधिकाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारी कार्यरत होते.