बेळगाव : बेळगावच्या गणेशोत्सवाची तब्बल ३२ तास चाललेल्या विसर्जन सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. अनंतचतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ४ पासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणूक सोहळ्याची बुधवारी मध्यरात्री सांगता झाली. यावेळी महानगरपालिकेच्या गणरायाचे विसर्जन सर्वात शेवटी करण्यात आले.
मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीने बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बेळगावच्या गणेशोत्सवात मोठा इतिहास रचला तब्बल ३२ तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत एकूण ३८६ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कपिलेश्वर उड्डाणपूलावर विसर्जन स्थळाच्या मुख्य मार्गावर रांगा लावलेले गणपती मनमोहक दिसत होते. पावसाने उघडीप दिल्याने तरुण वर्गासह आबालवृद्ध देखील विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहात आणि शांततेत विसर्जन सोहळा पार पाडला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस यंत्रणा, महानगरपालिका तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी योग्य व्यवस्थापन करत सोहळा यशस्वीरित्या पार पाडला.