17 जणांविरुद्ध गुन्हा
बेळगाव : बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील केपीटीसील एम्पलॉइज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माजी अध्यक्षासह एकूण 17 जणांविरुद्ध सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केपीटीसील एम्पलॉइज को-ऑप. क्रे. सोसायटीचे विद्यमान सचिव सुरेश हनुमंत वड्डर यांनी बेळगाव सीईएन पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून सोसायटीचे माजी अध्यक्ष नाथाजी पीराजी पाटील (रा. वैभवनगर) माजी सचिव महेश भावकाण्णा पाटील यांच्यासह 17 जणांवर भा.द.वि. 406, 408, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
सोसायटीमध्ये एकूण 3 कोटी 27 लाख 75 हजार 958 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अलीकडे झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत नव्या संचालक मंडळाची निवड झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा गैरव्यवहार उघडकीस आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या 1 जून 2015 ते 18 ऑक्टोबर 2020 या काळात हा गैरव्यवहार झाला असून नागराजप्पा या मृत व्यक्तीच्या नावे कर्जाची 30 खाती उघडून हा गैरव्यवहार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कर्नाटक सहकार संघ कायदा 1959 च्या कलम 64 अन्वये या गैरव्यवहाराची चौकशी झाली आहे. सोसायटीतील 2 कोटी 72 लाख 56 हजार 470 रुपयांचा दुरुपयोग झाला असून त्याच्या व्याजासहित 3 कोटी 27 लाख 75 हजार 958 रुपयांचा एकूण गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …