येळ्ळूर : श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळाच्या पुढाकाराने व बेळगाव पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त, दानशूर व्यक्ती, येळ्ळूर ग्रामस्थ व बेळगाव परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून, सिद्धेश्वर गल्लीतील सिद्धेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले होते. या मंदिराची वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य विलास बेडरे, शांता मासेकर, शालन पाटील, शिवाजी नांदुरकर, पी. आर. गोरल, दुर्गाप्पा तशिलदार, परशराम पाटील( पेंटर), महादेव काटकर, परशराम गोरल, तुकाराम उघाडे, आदित्य कुगजी, एल. आर. पाटील, राजू गोरल, यल्लुप्पा पाटील, गोविंद कालसेकर, बाबू डोन्यान्नावर, जोतिबा नंदीहळी, अजित गोरल, मनोहर गोरल यांच्यासह मान्यवर देणगीदारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी मंदिरात विविध देवी देवतांचे पूजन, होम, यज्ञ, वास्तुशांती पार पडली. यावेळी बोलताना ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील व माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी गल्लीतील कार्यकर्त्यांचे कौतुक केले व आज मंदिरांची आपल्या समाजाला गरज असल्याचे सांगितले. मंदिरासाठी देणगी दिलेल्या मान्यवरांचा सत्कार मंदिर कमिटीचे सुरज गोरल, यल्लाप्पा गोरल व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. गल्लीतील व गावातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय परशराम गोरल यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, तर आभार तुकाराम उघाडे यांनी मानले.