बेळगाव : अतिवृष्टीमुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विशेषतः वेंगुर्ला रोड – रायचूर – बाची हा राज्य महामार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्यावर बेळगाव – सावंतवाडी तसेच बेळगाव परिसरातील गावाकडे नेहमी अवजड वाहनांची वाहतूक असते. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या ठिकाणी लहानमोठे अपघात घडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना या रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
कर्नाटक सरकारने रस्ते दुरुस्ती व निर्मितीसाठी निधी मंजूर केल्याचे समजते तरी संबंधीत खात्याने रायचूर – बाची राज्य महामार्ग व बेळगाव – बाची हा मार्ग चारपदारी करण्यात यावा, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव तालुक्यातील इतर गावाचे रस्ते देखील खराब झाले आहेत. बडस ते बाकनूर रस्ता, मच्छे ते वाघवडे, कंग्राळी ते कडोली, पिरनवडी ते किणये, उचगाव ते बेकिंनकेरे तसेच महामार्ग ते शिंदोळी रस्ता आदी गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची येत्या पंधरा दिवसात संबंधित खात्याने दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी माजी आमदार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील, आर. के. पाटील, मनोहर संताजी, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, विठ्ठल पाटील, मोनाप्पा पाटील, मल्लाप्पा गुरव, सुधीर चव्हाण, आनंद पाटील, संतोष मंडलिक, अनिल पाटील, बाबाजी देसुरकर, मारुती पाटील, यल्लाप्पा घंटांनी, बाळासाहेब भगरे, नारायण दळवी, मनोहर हुंदरे, पियुष हावळ, डी. बी. पाटील, राजू किणयेकर, अरुण जाधव, विनायक पाटील, दीपक पाटील, आदी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.