बेळगाव : शहरात गणेशोत्सव आणि दसरोत्सवामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत फलक लागले असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या करवे यांनी शुक्रवारी (दि. ४) पुन्हा कोल्हेकुई करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल यांच्या वाढदिवसाच्या फलकावर कन्नड फलक लावून कंडू शमवून घेतला. शहर परिसरात मराठी आणि इंग्रजी भाषेत शुभेच्छा फलक आहे. कन्नडलाही फलकांवर स्थान देण्यात आले आहे, पण मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी आठवड्यात दुसऱ्यांदा आंदोलन केले. आज करवेचे मूठभर कार्यकर्ते महापालिकेसमोर जाऊन प्रशासनाला वेठीस धरत होते. शहरातील इतर भाषेतील सर्व फलक हटवावेत, अशी मागणी करत अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर करवेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोरील राहुल जारकीहोळी यांचा फलक हटवण्याचा प्रयत्न केला, पण काही क्षणातच फलक न हटवता इंग्रजी भाषेतील अक्षरे हटवून त्या ठिकाणी कन्नड अक्षरे लावली व आपला कंडू शमवून घेतला.