बेळगाव : शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता पुन्हा एकदा हलगा-मच्छे बायपासचे कामकाज आज सुरु करण्यात आले. दरम्यान आजपासून सुरु होणारे या कामाची माहिती शेतकऱ्यांना अगोदरच कळाली होती. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या शेतकऱ्यांनी सुरू करण्यात आलेल्या कामाला विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे.
अलारवाड क्रॉसजवळ हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांनी कालपासून यंत्रसामुग्री जमा जमा सुरू केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर सुरू होणाऱ्या कामासंदर्भात शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. उच्च न्यायालयाने या कामात विरोधातील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे कंत्राटदार पुन्हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या शेतामध्ये पिके आहेत. त्यामुळे यंत्रसामग्री घालून पिकांचे नुकसान केल्यास शेतकरी गप्प बसणार नाही असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
अलारवाड क्रॉस येथे कंत्राटदार हा रस्ता करण्याच्या तयारीत आहेत हे लक्षात येताच आज समिती नेते रमाकांत कोंडुसकर, शेतकरी नेते राजू मरवे, प्रकाश नायक, रवी पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी कंत्राटदार आणि उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारून अखेर पुन्हा एकदा बायपासचे कामकाज बंद पाडले आहे.