बेळगाव : सीसीआय स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या कुबेर चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद सीसीआय केआर शेट्टी संघाने हस्तगत केले आहे. अंतिम सामन्यात शेट्टी संघाने प्रतिस्पर्धी आनंद क्रिकेट अकादमी संघाला 8 गड्यांनी पराभूत केले.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर काल गुरुवारी कुबेर चषक स्पर्धेचे उपांत्य फेरीच्या सामन्यांसह अंतिम फेरीचा सामना खेळविला गेला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आनंद अकादमी संघाने प्रतिस्पर्धी बीएससी संघावर 15 धावांनी विजय मिळवला. त्याचप्रमाणे दुसऱ्या उपांत्य सामन्यात सीसीआय संघाने प्रतिस्पर्धी विजया अकादमी संघाला 75 धावांनी सहज पराभूत केले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद अकादमी संघाने मर्यादित 20 षटकात 3 गडी बाद 116 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय केआर शेट्टी संघाने 17.1 षटकात 2 गडी बाद 120 धावा काढून सामना जिंकला. शेट्टी संघाचा कलश बेनीकट्टी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे किरण बेनीकट्टी, प्रणय शेट्टी अनंत पाटील, पुनीत शेट्टी व प्रशांत लायंदर यांच्या हस्ते विजेत्या सीसीआय केआर शेट्टी आणि उपविजेत्या आनंद अकादमी संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे मालिकावीर श्रेया पोटे, सामनावीर कलश बेनीकट्टी, उत्कृष्ट फलंदाज झोया काझी, उत्कृष्ट गोलंदाज श्रवण खोत, इम्पॅक्ट खेळाडू आरुष पुत्रण, उत्कृष्ट यष्टीरक्षक कनिष्क बेनीकट्टी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कांदिल पाटील आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू अथर्व कर्डी यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी क्रिकेटप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …