निपाणी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन देणाऱ्यावर निपाणी पोलिसांनी कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका सुरू आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जातो. अन्यथा त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे.
कोल्हापूर व इतर ठिकाणच्या खाजगी बस चालकांच्याकडून बनावट रिपोर्ट तयार करून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देऊन पोलिसांनी साफळा रचला. पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवाशी वेश्यात कोल्हापूर येथील खाजगी बस कार्यालयात पाठवले. त्याठिकाणी आपल्याला बेंगलोरला जायचे आहे. पण आपल्याकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्याचे सांगितले. त्यावेळी खाजगी बस कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आम्ही आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून आपल्याला बेंगलोरला घेऊन जातो असे सांगण्यात आले. व त्यांना तिकीट दिले. बसमध्ये छुप्पे पोलिस कर्मचारी बसून कोगनोळी कर्नाटक सीमा नाक्यावर आले. याठिकाणी या गाडीची अडवणूक करून प्रवासी यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी चालक व अन्य कर्मचारी यांची चौकशी केली असता बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून प्रवाशी सोडत असल्याची माहिती समोर आली. यावेळी बस चालक व अन्य कर्मचारी यांच्यावर कारवाई करुन अटक करण्यात आली.
या अगोदर देखील महाराष्ट्रातून कर्नाटकात सीमा तपासणी नाका चुकून जाणाऱ्या खाजगी बसवर निपाणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्रातून हुपरी, मांगुर मार्गे निपाणीकडे व कागल मार्गे म्हाकवे आप्पाचीवाडी मार्गे निपाणीकडे जात असलेल्या दोन खाजगी बसेसवर निपाणी पोलीसांनी कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये पोलीसांनी खाजगी बसेस वर कडक कारवाई केल्याने चोरट्या मार्गाने व बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून अवैध वाहतूक करणाऱ्या बस चालकांच्या मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या कारवाईमध्ये निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी, सहाय्यक उपनिरिक्षक एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव यांनी सहभाग घेतला होता.
