बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात नवीन जलाशयाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 9 गावांना सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने 250 एकर जागेवर नवीन जलाशय बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध बेळगाव तालुक्यातील बसुर्ते ग्रामस्थांनी केला.
कोणत्याही कारणास्तव आपली जमीन देणार नसल्याचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसुर्ते गावातील शेतकरी महिलांनी निदर्शने केली. शासनाने आपला निर्णय बदलला नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
जलाशय उभारणीच्या नावाखाली बसुर्ते गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम सुरू आहे. हे कोणत्याही कारणास्तव होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार शेतकरी महिलांनी केला.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी बोलताना सुंठकर म्हणाले की, बेळगावच्या पश्चिम भागात मराठी शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांची सुपीक जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून मुख्यमंत्री व डउपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta