बेळगाव : उद्योजक संतोष पद्मण्णवर यांचा ९ ऑक्टोबर रोजी नैसर्गिक मृत्यू ठरलेल्या प्रकरणात त्यांच्या मुलीने खुनाची तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. खुनाचा गुन्हा दाखल करून घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून बुधवारी तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पत्नीसह पाच जणांविरोधात माळमारुती पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष ढुंडाप्पा पद्मण्णवर (वय ४८, रा. अंजनेयनगर) यांचा ९ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. परंतु, हा नैसर्गिक मृत्यू नसून, वडिलांचा खून झाल्याची तक्रार त्यांची मुलगी संजना संतोष पद्मण्णवर (वय १९) हिने मंगळवारी माळमारुती पोलिस ठाण्यात जाऊन केली. यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला. यामध्ये मृताची पत्नी उमा संतोष पद्मण्णवर (वय ४१, रा. अंजनेयनगर), शोबीतगौडा (रा. बेळगाव), घरातील कामगार नंदा कुरीया, प्रकाश कुरीया व अन्य एक अनोळखी यांचा समावेश आहे. यापैकी दोघेजण बंगळूरला असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी तेथून त्यांना ताब्यात घेतले आहे.
जागेवरच उत्तरीय तपासणी
ज्याच्यावर अंत्यसंस्कार झाले त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांना या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते. सदर व्यक्तीचा दफनविधी झाला असल्याने न्यायालयाने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीची परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तसेच अन्य तज्ज्ञांना बोलावून येथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा मृतदेहाचे दफन करण्यात आले. यावेळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, सरकारी डॉक्टरांचे पथक, मृताचे नातेवाईक उपस्थित होते. यावेळी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही करण्यात आले.