Saturday , July 27 2024
Breaking News

मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज म्हणजे माणूस घडविण्याचे केंद्र : माजी महापौर शिवाजी सुंठकर

Spread the love

माजी विद्यार्थी संघटना आणि एल्गार सामाजिक साहित्य परिषदतर्फे व्याख्यान व सत्काराचे आयोजन : प्राचार्य एम. बी. हुंदरे यांचा सत्कार

बेळगांव (प्रा. निलेश शिंदे ) : मराठी भाषा, संस्कृती, मराठीचे अस्तित्व चिरकाल स्मरणात टिकून राहील असे कार्य करुन भाषा वृद्धिंगत करायला हवी. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात परदेशी भाषेला बळी न पाडता माय मराठीची अस्मिता अखंड आणि अविरत ठेवण्यासाठी प्रत्येकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. संत ज्ञनेश्वरांनी पाया रोवला आणि संत तुकारामांनी भाषेचा कळस चढविला; छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीविश्वकोश त्यांच्या काळात पहिल्यांदा तयार केला; याचा अभिमान सर्वांना असायला हवा. समाज जगृतीसाठी शिक्षण हे प्रभावी साधन आहे. समाजाचे प्रबोधन शिक्षणाने होते. मातृभाषेतून उपक्रम राबवून जागृती केली तर सुधारणा होण्यास वेळ लागणार नाही. समाजसुधारकांनी आपल्या कार्यात शिक्षण प्रसाराला महत्वाचे स्थान दिले; वेळप्रसंगी मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येकांनी सामोरे यायला हवे. स्वातंत्र्य काळापासून बेळगांवमध्ये जागृतीसाठी समाज प्रबोधन चळवळ मोठी आहे. पण हल्लीच्या काळात मात्र भरपूर बदल दिसून येतात. वेळोवेळी होणाऱ्या अत्याचारांच्या घटना गंभीर होत आहेत. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आपल्या चांगल्या कार्यामधून उत्तर देणे महत्वाचे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक लोकांनी स्वतःला झोकून दिले असताना जे स्वातंत्र्य मिळवयाचे आहे त्या स्वातंत्र्याचे मोल जनतेला समजले पाहिजे याकरिता जागृती करून देशाला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित व चिरकाल टिकावे ही दूरदृष्टी ठेवून केवळ साक्षरता प्रसार, प्रौढ शिक्षण, सामाजिक परिवर्तन, सर्वसामाण्याच्या उद्धाराकरिता विविध चळवळी हाती घेऊन त्या नेटाने नेऊन यशस्वीही केल्या. स्वातंत्र्य पूर्व काळात जवळपास शंभर वर्षाच्या पाठीमागील काळ आठवला तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रात अनेकदृष्ट्या मागासलेल्या भाग वसलेला होता; जे थोर विचारवंत, कृतिशील कार्यकर्ते, समाजसुधारक, देशभक्त, आपल्या सभोवतालच्या विषम, अन्यायी, जुलमी परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे असे मानतात व त्या विषमतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, जुलूमाविरिद्ध, संघर्ष करण्यास सिध्द होऊन लढा उभारून परिवर्तन घडवून आणतात त्यांच्याबद्दल त्यांच्या काळातील आणि त्यांच्या नंतर येणाऱ्या पिढीतील प्रत्येकांना एक प्रकारच्या नव्या प्रेरणा देतात. त्यांचा व्यक्तिमत्वाबद्दल सुप्त आदर असतो. तो बऱ्याच वेळा अव्यक्त असतो. पण एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने तो व्यक्त होतो. याच प्रमाणे या वेळेच्या समाजसुधारकांनी बिकट परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता परिवर्तन घडवून आणले. शिक्षण ही सर्व सुधारणांची गुरुकिल्ली आहे; शिक्षणाशिवाय अज्ञ बहुजन समाजाला दुसरा तरणोपाय नाही, ही महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांची शिकवण शिरसावंद्य मानून ज्यांनी शेतकऱ्यांच्या झोपड्यापर्यंत शिक्षण नेले. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची नांवे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील चिरकालीन प्रकाशमान होऊन राहिलीआहेत. कर्मवीरांनी तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज आणि थोर संत महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेऊन रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले; त्याचा पुढे विशाल वटवृक्ष झाला तो पुढे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी तो तळागाळापर्यंत प्रचार आणि प्रसार करून पोहचवला. यांचा आदर्श आणि भारत स्वातंत्र्य चळवळीतील ब्रिटिशांविरुद्ध लढा यातून जागृत झालेली देशवासीयांची देशभक्ती उफाळून येते; त्यातून नवा भारत देश घडविण्यासाठी प्रत्येक समाज सुधारक आपल्या विविध सामाजिक कार्यातून पुढे वाटचाल करतात. समोर येणाऱ्या सर्व घडामोडी व भारत स्वतंत्र होण्यासाठी होणारी जन आंदोलने याचा प्रभाव सहजच देशांवर पडला होता. त्याचा परिणाम बेळगाव येथेही पडने आवश्यक होता आणि तो तसा पडलाही. या सर्वांचा आदर्श घेऊन इ.स. 1937 साली बेळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना केली; तर इ. स. 1942 साली समितीने मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. प्रारंभी गोविंद वामान हेरेकर, गोविंद विठ्ठल सराफ, कृष्णाजी वेंकटेश याळगी, डी. आर. ठाकूर, बोधराव विष्णू नाईक, बाबुराव ठाकूर, चतुरदास शाह, अण्णासाहेब लठ्ठे, रामकृष्णपंत जोशी, नारायण नागेश जोशी, आणि मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे पहिले शिक्षणतज्ञ प्राचार्य एम. ए. बिडिकर, प्राचार्य पी. एच. वाळवेकर, मराठी साहित्यातील नामवंत कवयित्री प्राचार्य इंदिरा संत, शिक्षणतज्ञ प्राचार्य मधुसूदन गोखले, प्राचार्य व्ही. पी. हलगेकर, प्राचार्य बी. जी. गोडबोले आणि शिक्षवृंद तसेच समाजसेवक, कार्यकर्ते यांनी समाजकार्याबरोबर , शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे याकरीता अतिशय मोठे परिश्रम घेतले. समाजामध्ये साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खेड्यापाड्यातून सर्व माध्यमांच्या प्राथमिक मराठी, कन्नड, उर्दू भाषांच्या शाळा कोणताही भेदभाव न करता; देशाचा सर्वांगिण विकास हा एकच उद्देश समोर ठेऊन कार्य केले. समाजाच्या जनकल्याकरीता कार्य करण्याची मोठी जिद्द मनात बाळगून देशाचा विकास घडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत कोणत्याच प्रकारची त्याला तोड नाही. पिढ्यानपिढ्या सावकार, जमीनदार, इनामदारांच्या आणि भांडवलदारांच्या शेतावर काबाडकष्ट करून राबणारी कुळे खऱ्या अर्थाने जमिनीचे मालक बनले पाहिजे असा आग्रह राष्ट्रवीर शामराव देसाई यांनी इ.स. 1930 साली आशावाद निर्माण केला होता आणि तो पुढे पूर्णत्वाला गेला; शेतावर प्रत्यक्ष राबणारा शेतकरी त्या शेताचा खरा मालक बनेल असे स्वप्न पाहिले होते ते खरे द्रष्टेपण होते ते आज कोणीही मान्य करील. समाजातील बहुजनांच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अथक अविरत परिश्रम घेऊन रात्रंदिवस मेहनत घेऊन कार्य केलेले आहे. गुरुवर्य शामराव देसाई, भुजंगराव दळवी, मामासाहेब लाड, व्ही. एस. पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी इ.स. 1941 साली बेळगांव जिल्हा शेतकरी शिक्षण समितीची स्थापना केली. शेती, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, ब्रिटिशांनविरुध्द भारत स्वातंत्र्य चळवळीतील तीव्र आंदोलने प्रभावी होत होती; लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक नेत्यांचा प्रभाव देशभर पडला होता. थोर समाजसुधारक दिवंगत नेते बाबुराव ठाकूर, गुरुवर्य शामराव देसाई यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. समाज प्रबोधन चळवळ उभ्या करुन सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख, कष्ट, संकटे दूर करून त्यांच्या डोळ्यातील असवे पुसली. समाजाला ज्ञान देऊन शहाणे करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याच प्रकारचा भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या जनतेला तिमिरातून प्रकाशाकडे घेऊन गेले; त्यांच्या जीवनात आनंद द्विगुणित केला; त्यांचाच वारसा समाजसेवक किरण ठाकूर साहेब पुढे घेऊन जातांना दिसतात. शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ट्रेनिंग कॉलेज पुन्हा चांगल्या पद्धतीने शिक्षक निर्माण करून सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पावले उचलली पाहिजेत. प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते ज्येष्ठ नेते, समाजसेवक व बेळगावचे माजी महापौर श्री. शिवाजी सुंठकर यांनी “आजच्या काळातील भाषेचे महत्व आणि ट्रेनिंग कॉलेजने दिलेले शैक्षणिक योगदान व समाज प्रबोधन चळवळ” या विषयावर व्याख्यानात मार्गदर्शन केले.

माजी विद्यार्थी संघटना आणि एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती संचलित मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी बेळगांव येथील नूतन प्राचार्य प्रा. डॉ. एम. बी. हुंदरे यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला म्हणून त्यांचा सत्कार सोहळा आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग कॉलेजच्या सभागृहात शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आले होते.

व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबारा माय मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष माजी प्राचार्य दिलीप चव्हाणसर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून बेळगावचे माजी महापौर आणि समाजसेवक श्री. शिवाजी सुंठकर, समाजसेवक श्री. पुंडलीक पावशे, समाजसेवक श्री. पृथ्वीसिंह बेळगाव, समाजसेवक श्री. गिरीष कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री. एस. जी. पाटील उपस्थित होते. यावेळी प्राचार्य एम. बी. हूंदरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजसेवक पुंडलीक पावशे, प्राचार्य एम. बी. हुंदरे, माजी प्राचार्य दिलीप चव्हाण यांचीही भाषणे झाली.

स्वागत मुख्याध्यापक प्रा. सतिश पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण बांडगे यांनी केले.
परिचय प्रा. सरदार झेंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन – प्रा. निलेश शिंदे यांनी केले. आभार प्रा. मोहन हागिदले यांनी मानले.

प्राचार्य हुंदरे यांना शुभेच्छा एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, माजी नगरसेवक श्री. अनिल पाटील, दिपक वाघेला, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, कर्नाटक राज्यस्तरीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माजी मुख्याध्यापक श्री. ए. बी. मुरगोड , निपाणीचे शिक्षक संजय मगदूम यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

समाजसेवक श्री. पुंडलीक पावशे म्हणाले, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजने गुरुजी निर्माण केले; ते कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांतून समाज निर्मितीसाठी आवश्यक तो बदल समाजात घडवून आणला. गोर, गरीब, दीन, पददलित, वंचित, शोषित समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे याकरीता अतिशय मोठे परिश्रम घेऊन कार्य केले आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविली. खेडोपाडी कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसतांना देखील त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. ते न विसरण्यासारखे आहे. यापुढेही उत्तमोउत्तम महाविद्यालय चालण्याकरिता आम्ही पाठीशी आहोत असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून माजी प्राचार्य दिलीप चव्हाण सर म्हणाले, दिवंगत नेते बाबुराव ठाकूर आणि किरण ठाकूर साहेबांनी बेळगावमध्ये चांगले कार्य केले आहे. काही ग्रामीण भागामध्ये वाचनालयासाठी, साहित्य संमेलन भरविण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी चांगले योगदान दिले आहे. आजच्या काळात तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवेचे व्रत आत्मसात केले पाहिजेत. नवनवीन पुस्तके वाचून ज्ञान संपादन केले पाहिजेत. प्रत्येकाने अवांतर वाचनाची आवड निर्माण केली की काय वाचावे हे कळत जाते. माणसाला जशी विचारांची आवश्यकता आहे तशीच विचार आत्मसात करण्यासाठी विविध वाचनाचीही आवश्यकता आहे. वाचनाने मनाला उभारी मिळते. महत्वाचे म्हणजे “माणूस” घडविण्यासाठी वाचन उपयोगी पडते. अशाच प्रकारची चळवळ नव्या पिढीच्या नव्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी नेहमी सतर्क राहून समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित केले पाहिजेत तरच आपला देशात वैचारिदृष्ट्या बदल घडवून येतील; आणि समाज निर्मितीसाठी बळकटी मिळेल.

यावेळी आनंद गोरल, प्रा. ए. एस. गोडसे, प्रा. उमेश बेळगुंदकर, प्रा. के. ए. हागिदले, सुरेश नाझरे, कल्लाप्पा परसण्णावर, सुनील देसुरकर, मोहन पाटील, सतिश पाटील, यल्लाप्पा पाटील तसेच विविध संस्थांचे, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, प्राध्यापक, पाठशिक्षक, विद्यार्थी, पालक, , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजला लाभली प्राचार्य इंदिरा संत यांची साथ

मराठी साहित्यातील सुप्रसिध्द कवयित्री आणि ख्यातनाम अध्यापिका मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजला प्राचार्या इंदिरा संत यांनी प्राचार्यपदी 1953 ते 1972 असा दीर्घ काळ कामकाज पाहिले; यांच्या काळात सेवा, कला, ज्ञान, उद्योग या चतू:सुत्रीवर महाविद्यालय चालविण्याचा प्रयत्न प्रा. इंदिरा संतांनी केला त्यामुळे कॉलेजची कीर्ती सर्वत्र पसरली. कॉलेजला अनेक राजकीय, साहित्यिक विचारवंत, समाजसेवक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यामध्ये द. तो. वामन, वि. द. घाटे, पंडित महादेवशास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, वाचस्पती क्षीरसागर, ना. ग. गोरे, विनोबा भावे, गो.नी. दांडेकर, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, काकासाहेब कालेलकर, जयप्रकाश नारायण, डॉ. राजेंद्र प्रसाद, एस. एम. जोशी, नाथ पै, कृष्णा मेणसे, विठ्ठल याळगी, शंकरराव किर्लोस्कर, जयंतराव टिळक, एस. ए. डांगे यांनी भेटी दिल्या.
समाज प्रबोधन चळवळ सुरू केल्या आणि खेडोपाडी जाऊन शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करून महत्व पटवून दिले. अनेक संकटांना सामोरे जाण्यासाठी बहुजनांना प्रेरणा देऊन प्रगती करण्यास तयार केले. माजी महापौर शिवाजी सुंठकर महापौर पदावर असताना महाविद्यालयाला भेट देऊन वास्तविकतेची माहिती घेतली होती आणि सहकार्य करण्यात आले होते; त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित राहण्याचा मान प्राप्त झाला होता. पुनः आज या ज्ञान मंदिरात प्रमुख वक्ता म्हणून येणे झाले; या महान परंपरा अखंड चालू ठेवण्यासाठी आम्ही वेळोवेळी सहकार्य करायला तयार आहोत. अशा जुन्या मराठी संस्था जिवंत ठेवणे अतिशय गरजेचे आहे. अशासामाजिक शैक्षणीक संस्था व्यवस्थित चालाव्यात याकरिता आपण चांगले कार्य करून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे असा आशावाद व्यक्त केला.


बेळगांव जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही मोलाचे योगदान

बेळगांव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या कार्यकाळातील शिक्षण क्षेत्रात बेळगांव जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही मोलाचे मोठे योगदान योगदान दिले आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात मराठी – 180 शाळा, कन्नड – 54 , उर्दू – 02, आणि रात्रशाळा काढून खेडोपाडी जाऊन शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी शाळा काढून ज्ञान दानाचे कार्य केले. कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसतांना देखील जागृती करून बिना मोबदला घेता ज्ञानार्जनाचे कार्य केले. उच्च – नीच्च, गरीब- श्रीमंत, जाती – धर्म न मानता सर्व समावेशक सक्तीचे आणि मोफत शिक्षण देऊन सर्वसामाण्याचा सामाजिक उद्धार करण्यासाठी परिश्रम घेऊन रात्रंदिवस मेहनत घेतली; बदल घडवून आणले.

—————————

मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकर प्राप्त व्हावे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा केला जावा असा एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगावच्या वतीने या कार्यक्रम प्रसंगी मागणी करण्यात आली. शासनाने पुढाकार घेऊन लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *