बेळगाव : बेळगाव महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. महापालिकेला येणे असलेली थकबाकी, भाडेपट्टी व महसूल वाढीबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बेळगाव महापालिकेत आज महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.
बेळगाव महानगरपालिकेच्या सभेच्या सुरुवातीला नुकतेच निधन झालेल्या नगरसेविका जरीना फतेखान यांचे पती खतल अहमद फतेखान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विरोधी पक्षातील मराठी नगरसेवक रवी साळुंके यांनी सभेच्या कार्यसूचीचे मराठीत भाषांतर करताना झालेल्या चुका सभेच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी पुढील वेळी असे होऊ नये याची काळजी घेणार असल्याचे सांगितले. महापौरानी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य लक्ष देऊन पुढील वेळी अशा चुका करू नयेत, असा सल्ला दिला.
ज्या दुकानांची भाडेकरार संपला आहे, ती दुकाने रिकामी करण्याबाबत चर्चा झाली. नवीन येणाऱ्यांना भाडेकरारावर ती दुकाने का दिली जात नाही? असा सवाल नगरसेवक राजशेखर डोनी, नामनिर्देशित नगरसेवक दिनेश नाशिपुडी आणि रवी धोत्रे यांनी केला. अधिकाऱ्यांवर दबाव आहे का? पोलिस व कौन्सिलच्या मदतीने कारवाई करून पुढील बैठकीपूर्वी कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.नगरसेवक नितीन जाधव यांनी गोवेवेस पेट्रोल पंपाच्या लिलाव प्रक्रियेचा उल्लेख करून लिलाव आजपर्यंत त्या ठिकाणी व्यवसाय का सुरु केला नाही, अशी विचारणा केली. त्याला उत्तर देताना उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी पाच लाख रुपये ॲडव्हान्स भरून लिलाव जिंकलेल्या आदित्य बिल्डर्सने आधी तेथील बांधकाम हटवावे आणि मोकळी जागा द्यावी, अशी मागणी केली होती. जागा रिकामी करण्यासाठी अनेक वेळा नोटिसा देऊनही उत्तर आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी त्यांनी थकबाकी कधी भरली, असा सवाल केला. उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याची माहिती देताच नगरसेवक नितीन जाधव व रवी धोत्रे यांनी धनादेश घेण्यासाठी महापालिकेकडे अधिकारी आहे का, असा सवाल केला. मात्र, अधिकाऱ्यांनी गोंधळून जाऊ नये, जे समजू शकत नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर द्यावे, असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी सुचविले की, अधिकाऱ्यांनी नियमितपणे थकबाकी वसूल केली तर मोठी रक्कम उरणार नाही. थकीत रक्कम मिळण्यासाठी दिरंगाईचे धोरण अवलंबणाऱ्या यापूर्वीच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्की यांनी गोवेवेस पेट्रोल पंपाची जागा भाडेतत्त्वावर देण्याऐवजी तेथे व्यापारी संकुल बांधून उत्पन्न मिळावे, अशी सूचना केली. तसेच शहरातील अनेक ठिकाणी असलेल्या महापालिका इमारतींकडील थकबाकी वसूल करून ती शहराच्या विकासासाठी वापरावी, अशी सूचना नामनिर्देशित नगरसेवक रमेश सोनटक्की व नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली. आयुक्त शुभा बी यांनी महापौर सविता कांबळे यांना गोवावेस पेट्रोल पंपाच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी वेळ मागितला. दरम्यान, नगरसेवक रवी धोत्रे यांनी महापौरांना त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी 30 ते 40 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्याची विनंती केली. तसेच नगर सेवक हणमंत कोंगाळी यांनीही प्रभागाचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचे आदेश महापौरांनी द्यावेत, अशी इच्छा व्यक्त केली. नगरसेविका वाणी विलास जोशी यांनीही आम्हाला तेवढ्याच रकमेचे बजेट देण्याची विनंती महापौरांकडे केली.
नगरसेवक राजशेखर डोणी यांनी गेल्यावर्षी महापौर ट्राफी स्पर्धा अनेकदा पुढे ढकलण्यात आली आणि महापौरपदाची ट्रॉफी कधीच झाली नाही. त्यामुळे या वेळी महापौर ट्रॉफी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये व्हावी, अशी मागणी महापौरांकडे केली. विधान परिषद सदस्य साबन्ना तळवार यांनी सांगितले की, कोट्यवधी रुपये खर्च करून बेळगावातील अशोकनगर येथे 2 वर्षांपूर्वी स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधले आहे. पण ते आजपर्यंत जनतेसाठी त्याचे लोकार्पण का केले गेले नाही? त्याला उत्तर देताना अधिकाऱ्यांनी याबाबत निविदा मागविल्याचे सांगितले. त्यापैकी एक संकुल सुरू केल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. अन्य दोन संकुलांची अवस्था नादुरुस्त असल्याचे विधान परिषद सदस्या साबन्ना तळवार यांनी सांगितले. ते सुरू करून महापालिकेने खर्च केलेला पैसाही वसूल करता येईल, असा सल्ला त्यांनी दिला. आमदार आसिफ सेठ यांनीही याचा प्रतिवाद केला. दरम्यान, शहरात वाढणाऱ्या अनधिकृत इमारतींवर कडक कारवाई करण्याची मागणी नगरसेवक हणमंत कोंगाळी यांनी केली. आमदार आसिफ सेठ यांनी हा मुद्दा उपस्थित केला असता, महापौरांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.