बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील फार मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला आहे. या अन्यायाविरुद्ध सीमा प्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे एक नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते अन्याय झालेला सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी येथे जनतेने लोकशाही प्रणित सारे मार्ग चोखाळलेले आहेत. सत्याग्रह मोर्चा हरताळ संप उपोषण आणि इतर लोकशाही मार्गाने लढेकरून येथील जनतेने केंद्र सरकारला वेळोवेळी न्याय देण्याची विनंती केली आहे पण केंद्र सरकारमध्ये मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो सीमा भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. सारे मार्ग चोखाळल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांना प्रतिवादी बनवून सर्वोच्च न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला आहे पण याही बाबतीत अक्षम्य दिरंगाई होत आहे. पुन्हा एकदा येथील मराठी भाषिक जनतेचा निर्धार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सीमा भागात वेगवेगळ्या प्रकारे काळ्या दिनी निषेध प्रकट करण्यात येणार आहे. बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर 2024 रोजी मुक सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल फेरीत मराठी भाषिक जनतेने प्रचंड संख्येने सामील व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
या सायकल फेरीची सुरुवात संभाजी उद्यान महाद्वार रोड येथून सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी होणार असून बेळगाव शहापूर आणि टिळकवाडी भागात फिरून मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे या कार्यक्रमात साऱ्यांनी भाग घेऊन निषेध व्यक्त करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.