बेळगाव : शहरातील वाहतूक मार्गात १ नोव्हेबरला बदल करण्यात येत आहे. प्रमुख मार्गऐवजी पर्यायमार्गे वाहतुकीसाठी मार्ग खुला असणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बेळगावात १ नोव्हेंबरला राज्योत्सव मिरवणूक आहे. यानिमित्त प्रमुख मार्गावरील वाहतुकीत बदल असेल. जिल्हा क्रीडांगणावरून मिरवणूक सुरु होईल. नेहरुनगर, बी. आर. आंबेडकर उद्यान, चन्नम्मा चौकमार्गे मिरवणूक काकतीवेस, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोडमार्गे सरदार्स मैदानाजवळ पोचल्यानंतर मिरवणुकीची सांगता होईल. वाहतुकीत बदल १ नोव्हेंबर सकाळी ५ ते २ नोव्हेंबर पहाटे २ वाजेपर्यंत करण्यात येईल. यादरम्यान दुचाकीबरोबरच अन्य स्वरुपाच्या वाहनांसाठी पर्यायमार्गे वाहतुकीसाठी मार्ग खुला असेल. चिक्कोडी, संकेश्वर, कोल्हापूरहून केएलईकडे येणाऱ्या वाहनांसाठी बॉक्साईट रोड, हिंडलगा फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी चौक, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय, शर्कत पार्क, ग्लोब थियटरमार्गे खानापूर रोडकडे जाता येईल.
गोवा, खानापूर या मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय मार्गे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडे जाता येणार आहे. तसेच जितामाता चौक, देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावेचौक मार्गावरील वाहनांना शनिमंदिर येथून रेल्वे स्थानक आणि तेथून खानापूरला जाता येईल. तर ओल्ड पीबी रोडमार्गे ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी सर्किट हाऊस, अशोक सर्कल, कनकदास चौकमार्गे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्त्याकडे जाता येईल, असे कळविले आहे.
वाहन पार्किंगसाठी केईबी मैदान, ओल्ड भाजी मार्केट, धर्मनाथ भवन, पट्टेज हॉस्पीटल ते गँगवाडी, सीपीएड मैदान, क्लब रोड ते महात्मा गांधी चौक, महिला पोलिस ठाणे आवार, मराठी विद्यानिकेतन शाळा मैदान, बेननस्मिथ कॉलेज मैदान आदी 35 ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था असेल, असे पोलिस आयुक्तांनी कळविले आहे.