अथणी : अथणी शहाराच्या हद्दीतील मदभावी रोडनजीक चौहान मळ्यातील फार्म हाऊसमध्ये एका दाम्पत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हत्येचा संशय बळावला आहे. नानासाहेब बाबू चौहान (वय ५८) आणि जयश्री नानासाहेब चौहान (वय ५०) यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचा संशय असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले.
त्यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दाम्पत्याचा मुलगा अन्य एका गुन्ह्यात आरोपी म्हणून तुरुंगात असल्याने त्यांनी मानसिक त्रासातून आत्महत्या केली असावी असा संशय होता. पण पोलीस खात्याच्या तपासानुसार आरोपींनी दगडाने दरवाजा तोडून आत प्रवेश करून त्यांचा खून केल्याचा संशय आहे.
याप्रकरणी अथणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हत्येतील आरोपींबाबत माहिती गोळा केली जात असून लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल, असे ते म्हणाले.