बेळगाव : वक्फ कायदा मुस्लीम आणि कुराण नियमांनुसार लागू होत नाही. याशिवाय, हा कायदा अमानवीय, हीन आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा आहे. वक्फ कायदा त्वरित रद्द करणे आवश्यक आहे, असे कोल्हापूर कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर मठाचे स्वामीजी यांनी सांगितले.
वक्फ बोर्ड विरोधात बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी उद्यानात नागरिक हितरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आयोजित केलेल्या भव्य जनजागृती सभेत ते बोलत होते. ब्रिटिशांकडून लागू केलेल्या या कायद्यात स्वातंत्र्यानंतर मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनेक बदल करण्यात आले आणि त्याचे परिणाम आज अत्यंत शक्तिशाली रूपात दिसून येत आहेत. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात या कायद्यात नवीन नियम जोडले गेले, ज्यामुळे या कायद्याचा गैरवापर होऊन शेतकऱ्यांवर याचे दुषपरिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.वक्फ बोर्डात एक खासदार, एक आमदार, एक जिल्हाधिकारी, एक निवृत्त आयएएस अधिकारी, एक लिपिक आणि एक प्रशासक आणि एक मुस्लिम वैयक्तिक कायदा तज्ञ असे एकूण सात सदस्य असतात. मात्र या बोर्डवर बिगर मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना स्थान नाही. शिया आणि सुन्नी यांच्याशिवाय इतर मुस्लिम पोटजातींना या वक्फचा फायदा होत नाही. या असंवैधानिक नियमांमुळे वक्फ बोर्ड वेडेपणा करत असल्याची टीकाही स्वामींनी केली.
हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर स्वामीजी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व मठांचे स्वामी एकत्र येऊन लढा देत आहेत. शेतकऱ्यांना अडचणीत आणणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. नागरीकी हितरक्षण समितीचे सदस्य रोहित उमनाबादीमठ बोलताना म्हणाले, सरकारने वक्फच्या नमुन्यावर सनातन मंडळाची स्थापना केली तर आम्ही सनातन अट्टक ते कटक म्हणजेच इराण, इराक अफगाणिस्तान, पाकिस्तान या सर्व भूमी भारतात सामील करू. सनातनी मंडळाची स्थापना झाल्यावर सम्राट अशोक, इम्मडी पुलकेशी, हर्षवर्धन यांची राजवट कंबोडियात पसरली. सांस्कृतिकदृष्ट्या भारताने जगातील सर्व खंडांमध्ये आपला प्रभाव सोडला आहे. ते सर्व खंड सनातन मंडळाच्या अखत्यारीत येतात. राज्य सरकार पोटनिवडणुकीमुळे वक्फ नोटीस मागे घेत आहे. पण पुढे सरकार कोणता निर्णय घेईल याची शास्वती नाही. त्यामुळे वक्फ रद्द होईपर्यंत लढा देऊ, असे ते म्हणाले.
रोहण जुवळी यांनी स्वागत तर शिवाजी शहापूरकर यांनी आभार मानले. डॉ. बसवराज भागोजी आणि विनोद यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.