बेळगाव : अनगोळची बससेवा ही गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून पूर्णपणे कोलमडली आहे. गावामध्ये बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी, महिला व नागरिकांना दररोजच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बससेवा लवकर पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी नागनुरी यांना बुधवारी देण्यात आले. गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून अनगोळची बस ही गावातील शेवटच्या बसथांब्यावर न आणता गावच्या बाहेर थांबवत असल्याने गावातील सर्वांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बस ही लक्ष्मी मंदिर या शेवटच्या बसस्थानकापर्यंत सोडावी, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांतून करण्यात आली आहे. परशुराम पुजेरी यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आणि अनगोळ गावात लवकर बस पूर्ववत सुरू करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगितले. दरम्यान, तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ प्रमुख उमेश कुऱ्याळकर, संदीप लाटुकर, मनोज चावरे, मारुती हुंदरे, तुषार नेतलकर, समर्थ आदी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Belgaum Varta Belgaum Varta