मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगाव विजेता
बेळगाव : बंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक खो-खो स्पर्धेत बेळगावातील मुलांच्या संघाने अंतिम फेरीत म्हैसूरला नमवित विजेतेपद पटकाविले.
या संघाचे आगमन बेळगाव रेल्वेस्थानकावर होताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
उपस्थित सर्व खेळाडूंना गुलाबपुष्प आणि पेढे भरवून अभिनंदन केले आणि त्यानंतर अल्पोपहार दिला.
यावेळी बोलताना आर. एम. चौगुले यांनी त्यांच्या यशाचे कौतुक करून भविष्यात देशपातळीवर बेळगावचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत बेळगावने बंगळूर, रायचूर, बागलकोटचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता सोमवारी (ता. १८) सकाळी खेळविण्यात आलेल्या अंतिम लढतीत बेळगावने बलाढ्य म्हैसूरचा १ गडी ५ मिनिटे राखून दारुण पराभव केला.
सोहम भातकांडे याने उत्कृष्ट खेळ खेळला. संपूर्ण स्पर्धेत संघातील श्री तरळे, राज भातकांडे, सोहम भातकांडे, संकल्प सांबरेकर, वैभव भातकांडे, कार्तिक भातकांडे, वैभव गोरे, श्रीधर कटांबळे यांनी उत्कृष्ट खेळ करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. या संघाला प्रशिक्षक प्रदीप भांदुर्गे, अरविंद मन्नोळकर यांचे मार्गदर्शन तर बेळगाव जिल्हा आम्युचर खो-खो संघटनेचे सचिव नारायण पाटील, नितीन नाईक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे संघाला प्रोत्साहन लाभत आहे.