बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावासियांच्यावतीने महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे मंगळवार दिनांक २६ रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत चव्हाण पाटील यांनी स्वागत केले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या वतीने २००६ पासून अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी २००६ पासून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेेेळ घेण्यात येतो. गेल्या दोन वर्षापासून कर्नाटक सरकारने लोकशाही मार्गाने सीमावासीय लढत असताना त्यांच्या न्याय हक्कावर गदा आणून, लोकशाहीचा मुल्ये पायदळी तुडवून, लोकशाहीचा गळा घोटून, सीमावासियांना महामेळावा घेण्यावर दबाव आणण्यात येत असतो. परंतु यावर्षी कोणत्याही दबावाला भिक न घालता लोकशाही पद्धतीने बेळगावमध्ये महामेळावा यशस्वी करूया असा निर्धार करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य ऍड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, ऍड. प्रसाद सडेकर, रामचंद्र मोदगेकर, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, मनोहर हुंदरे, अनिल पाटील, पियुश हावळ, मनोहर संताजी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, आदींनी आपले विचार व्यक्त केले.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य बी. एस. पाटील, आर. के. पाटील, मोनापा पाटील, विकास कलघटगी, मल्लाप्पा गुरव, आदी सदस्य उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य बि. डी. मोहनगेकर यांनी आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta