बेळगाव : थोर समाजसुधारक राष्ट्रवीरकार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी राहणार असून त्यांच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, घोंगडी व पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य, लेखक व पत्रकार कॉम्रेड भालचंद्र कांगो याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
कॉ. कृष्णा मेणसे हे ज्येष्ठ कामगार नेते, साहित्यिक व पत्रकार आहेत. स्वातंत्र्य लढा, सीमालढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती आंदोलन व विविध कामगार चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. गोठलेली धरती पेटलेली मने, परिक्रमा, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, क्रांतिसिंह नाना पाटील, हो चि मिन्ह, असा लढलो असा घडलो आदी पुस्तके त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. बेळगांव सिटी मझदूर को ऑप. सीएसटीचे संस्थापक तसेच साप्ताहिक साम्यवादीचे ते संस्थापक संपादक आहेत. या त्यांच्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
ज्योती महाविद्यालय येथे हा समारंभ होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुरस्कार समितीने केले आहे.