बेळगाव : सोमवार दिनांक 9 डिसेंबरपासून सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीने हालचाली चालविलेल्या असल्याची माहिती आहे. म. ए. समितीच्या महामेळाव्याला कदापिही परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल बाहेरून बेळगाव येणाऱ्या नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून कोणी येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तडीपारच करू, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
सुवर्णसौध येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती देताना मोहम्मद रोशन यांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशनासाठी परवानगी मागितली होती. मात्र या मेळाव्याला कदापिही परवानगी देण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. मागील वेळेस त्यांनी शिनोळी येथे महामेळावा घेण्यात आला होता. यावेळीही त्यांना बेळगाव बाहेर मेळावा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही म. ए. समितीच्या वतीने बेळगाव शहरात महामेळावा घेण्याबाबत हालचाली होत असल्यास, त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई केली जाईल. या महामेळाव्यासाठी इतर ठिकाणाहून कोणीही बेळगावत येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटकाव केला जाईल. निपाणी तसेच शिनोळी चेक पोस्ट येथे चोख बंदोबस्त राखण्यात येईल. बंदी आदेश झुगारून येणाऱ्यांना तडीपार केले जाईल, असेही मोहम्मद रोशन यांनी यावेळी स्पष्ट केले.