
समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकास्पद कार्य
बेळगाव / माधुरी जाधव (प्रतिनिधी) : आजचे जग स्वार्थाने बरबटलेले आहे.मदत करणे तर दूरच पण कोणीही कोणाच्या अध्यात – मध्यात पडत नाही. अशाही परिस्थितीत माणुसकी कुठेतरी शिल्लक असल्याचा प्रत्यय शनिवार (दि. ७ डिसेंबर) रोजी आला. केएलई रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सानवी डोले या अवघ्या एका वर्षाच्या चिमुकलीला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची कमतरता भासत असल्याने माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन तिला मदतीचा हात दिला.
सानवी डोले या चिमुकलीच्या हृदयाला जन्मतःच छिद्र आहे. यावर शस्त्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. मात्र शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्ताची कमतरता आहे. रक्त मिळताच शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच सानवी हिचा रक्तगट ‘एबी’ निगेटिव्ह असे रक्त संकलन करणेही अवघड असल्याने सानवीचे पालक, नातेवाईक तसेच रुग्णालयाकडून प्रसिद्धी आणि समाजमाध्यमांच्या सहाय्याने (सोशल मीडियाद्वारे) शहरातील नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करण्यात आले होते.
समाजसेविका माधुरी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना याची माहिती मिळाल्याने, त्यांनी तातडीने केएलई रुग्णालयात धाव घेतली आणि चिमुकल्या सानवीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदान करून माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून तिला आधार दिला.
यामध्ये समाजसेविका माधुरी जाधव, सागर पाथरवट, सत्यम कोनेरी, सार्थक जाधव, अपूर्वा चौहान, सुशांत कुरणकर, आयान शेख यांनी रक्तदान करून सहकार्य केले. सानवीचे वडील कृष्णा डोले यांनी मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदान केल्याबद्दल समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
आवाहन
सानवीच्या शस्त्रक्रियेसाठी ताज्या ‘एबी निगेटिव्ह’ रक्ताची गरज असून रक्तदान करू इच्छिणाऱ्या मंडळींनी कृष्णा डोले : 9591364048, माधुरी जाधव : 7760266247 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सानवी सध्या केएलई हॉस्पिटल बेळगाव, मलप्रभा फ्लोअर बेड क्र.एमएफ ०६ येथे उपचार घेत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta