बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे संपन्न होणार असून सदर भव्य सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात वाहण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, यावर्षी सामान्यज्ञान स्पर्धेचे चौथे वर्ष असून ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सामान्यज्ञान, बौद्धिक क्षमता या विषयावर आयोजित केली जाते, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी एक पायरी म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहू शकतो. यावर्षी ही स्पर्धा पूर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा चार गटांमध्ये आयोजिली असून सीमाभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा. यावर्षी या स्पर्धेला दोन हजाराहून अधिक विद्यार्थी येण्याची शक्यता असून ज्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून आपले योगदान द्यायचे असेल त्यांनी युवा समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बैठकीला कार्याध्यक्ष सचिन कळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, इंद्रजीत धामणेकर, सुरज चव्हाण, प्रतीक पाटील, आशिष कोचेरी, निखिल देसाई , रितेश पावले, प्रवीण धामणेकर, अक्षय बांबरकर आदी उपस्थित होते. साईनाथ शिरोडकर यांनी आभार मानले.