बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को- ऑप. सोसायटीच्या वतीने २०२५ सालाकरीता छापलेल्या नवीन
दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्री चांगळेश्वरी मंदिर येथे चेअरमन राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एसबीआय बँकचे निवृत्त अधिकारी श्री. अरुण नाईक हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सन्मित्रचे व्हा. चेअरमन सतिश पाटील, येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी, विद्यमान ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर आणि उद्योजक एन. डी. पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व सोसायटीच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. व्हा चेअरमन सतिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोसायटीच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या सन्मित्र गोल्ड ओवर ड्राफ्ट योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख वक्ते अरुण नाईक यांनी सहकार व बँकिंग क्षेत्र या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले व सोसायटीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमासाठी सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, मार्गदर्शक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन हुंदरे यांनी केले तर महेश पाटील यांनी आभार मानले.