बेळगाव : शहरातील आनंदनगर वडगाव दुसरा क्रॉस येथील नाला बांधकामावर रहिवाशांचा आक्षेप असून, त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले. मंत्र्यांनी निवेदन स्वीकारत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सध्या महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आनंदनगर येथे नाल्याचे बांधकाम सुरू आहे. तथापि, पूर्वी अस्तित्वात नसलेल्यांना या नाल्यामुळे अनेक रहिवाशांच्या घरांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नाल्याचे बांधकाम त्यांच्या संमतीशिवाय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी काम थांबवले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी नाल्याच्या बांधकामस्थळी भेट दिली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना नाल्याचे काम खासगी जागेऐवजी सरकारी जागेतून करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांसोबत संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर, संतोष पवार व प्रभावती मास्तमर्डी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मंत्र्यांना भेटून निवेदन दिले. माजी अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले की, आनंदनगर येथील नाल्याचे बांधकाम खुल्या जागेत चार फूट रुंदीचे असून नागरी वसाहतीमध्ये आठ फूट रुंदीचे केले जात आहे. यामुळे घरांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचण्याची शक्यता आहे. खुल्या जागेत नाला रुंद करून नागरी वसाहतीमध्ये त्याची रुंदी चार-पाच फूट ठेवावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली असली तरी ती दुर्लक्षित केली जात आहे.”
काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी नाला बांधकामाच्या विरोधात आवाज उठवताना सांगितले की, “या अन्यायकारक बांधकामाबाबत आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी सर्वांगीण चौकशी करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.” त्यांनी स्थानिक नगरसेवकांच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, “जनतेची सेवा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे,” असेही ठणकावले होते.
यावेळी महिलांसह आनंदनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रहिवाशांनी प्रशासनाकडे नाल्याच्या पर्यायी मार्गाचा आग्रह धरत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.