बेळगाव : हुतात्मा दिनाच्या औचित्य साधून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे “चलो कोल्हापूर”चा नारा देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमाप्रश्नासंदर्भातील खटला, 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत त्याचप्रमाणे दिल्ली साहित्य संमेलन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील 17 जानेवारी रोजी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून “चलो कोल्हापूर”चा नारा देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोल्हापूर येथे जावून महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी बोलताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले की, 17 जानेवारी हुतात्मा दिन बेळगावसह सीमाभागात गांभीर्याने पाळणे. त्याचप्रमाणे 12 जानेवारी रोजी आयोजित केला जाणारा युवा दिन साजरा करणे तसेच सीमा प्रश्न प्रलंबित असलेला खटला लवकरात लवकर निकालात लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निवेदन सादर करण्यासंदर्भात मध्यवर्तीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
17 जानेवारी रोजी बेळगाव शहरासह खानापूर आदि ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व कार्यकर्त्यांनी व समिती पदाधिकाऱ्यांनी सकाळी ठीक 10.30 वाजता बर्डे पेट्रोल पंपाजवळ स्वतःच्या वाहनासहित जमायचे आहे व तेथून कोल्हापूर येथे प्रयाण करावयाचे आहे. त्यानंतर दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीमाप्रश्नासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मराठा महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन करून पुन्हा बेळगावला परतायचे आहे असे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta