उचगाव : निर्मिती ग्रामीण अभिवृद्धी समाजसेवा संस्था कुद्रेमानी यांच्या वतीने उचगाव विभागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ही लक्षवेधी मुलाखत संस्थेच्या संस्थापिका आणि अध्यक्षा डॉ. सरिता मोटराचे गुरव यांनी घेतली.
सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवर डॉ. शरद बाविस्कर, विश्वभारत सेवा समिती संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय नंदीहळ्ळी, विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक पितांबर सोमनाथ, येळ्ळूर साहित्य संघाचे अध्यक्ष पराशराम मोटराचे, अशोक नाईक यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. बाविस्कर यांचा शाल आणि पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. तसेच इतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
दहावीची परीक्षा जवळ आली असताना मुलांच्या मनातील परीक्षेच्या संदर्भातील, अभ्यासासंदर्भातील, आपल्या भविष्यासंदर्भातील जो संभ्रम आहे तो दूर व्हावा. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांना आपले ध्येय पक्के करून ते गाठण्यासाठी कोणावरही विसंबून न राहता स्वतःच्या यशाचा मार्ग त्यांनी स्वतः चोखाळावा याच उद्देशाने जेएनयुमध्ये फ्रेंच भाषेत तत्वज्ञानाचे धडे देणारे डॉ. शरद बाविस्करांच्या जीवनातील संघर्ष विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न निर्मिती संस्थेच्या माध्यमातून केला गेला.
दहावीत इंग्रजीत १८ गुण घेऊन नापास तरीही ‘झिजून मरावं पण थिजून मरू नये’ या आपल्या आईच्या प्रेरणादायी वाक्यातून त्यांनी अपयशावर मात करत लंडन, फ्रान्स, युरोप, पॅरिस या देशात शिक्षण घेत पाच मास्टर्स डिग्री मिळवून आठ भाषांवर प्रभुत्व मिळविले. हा जो त्यांचा जीवनप्रवास आहे तो अनेक प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडला.
‘भुरा’ही एकच आत्मकथनात्मक कादंबरी लिहून सरांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. अवघ्या चार वर्षात पुस्तकाची सोळावी आवृत्ती निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलाखतीमध्ये अभ्यास कसा करावा? अपयश आले आहे तरी खचून न जाता कसे मार्गक्रमण करावे? जो चालतो तोच यशस्वी होतो.भारतातील शिक्षण व्यवस्था आणि बाहेरच्या देशातील शिक्षण व्यवस्था, वाचन चळवळ, मातृभाषा हेच शिक्षणाचे खरे माध्यम, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया, भारतातील सद्यस्थिती, शिक्षकांची, पालकांची आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी अशा अनेक विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शेवटी डॉ. बाविस्कर स्वतः उठून विद्यार्थ्यांमध्ये आले आणि संवाद साधला. त्यांच्याशी संवाद म्हणजेच आपल्या मनाशी संवाद असल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून आले.
यावेळी गणपत पाटील, वसुंधरा मोटराचे, लक्ष्मी जांबोटकर, पूजा पाटील, मीरा पाटील, वनिता मोरे, एस. एम. मिलके, प्रसाद कांबळे, सुहास गुरव, शशिकांत धामणकर, एस. बी. पाटील तसेच विविध शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta