बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनयू विद्यापीठाचे प्राध्यापक, भुरा या चरित्रात्मक कादंबरीचे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्यासोबत गप्पाटप्पांचा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साठे प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शरद बाविस्कर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रबोधिनीचे सदस्य प्रा. सुरेश पाटील, मराठी विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे व विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद मोळेराखी उपस्थित होते. प्रास्ताविक नारायण उडकेकर यांनी केले. यानंतर डॉक्टर शरद बाविस्कर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शरद बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या जडणघडणी विषयी व शैक्षणिक प्रवासाविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांचा हा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शरद बाविस्कर यांनी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्षाला भेट देऊन या विभागातर्फे चालणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रबोधिनीचे सदस्य इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, प्रतापसिंह चव्हाण, गौरी ओऊळकर, धीरजसिंह राजपूत, मराठी विद्यानिकेतन चे सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. एम पाटील व आभार नीला आपटे यांनी मांडले.