बेळगाव : नशेत दोन भावांमध्ये वादावादी होऊन दोघेही दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला असून ही घटना बेळगाव तालुक्यातील निलजी येथे शुक्रवारी (ता. १०) रात्री उशिरा घडली. सुशांत सुभाष पाटील (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मोठा भाऊ ओंकार (२३) जखमी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोघाही भावंडांना गेल्या काही वर्षांपासून गांजाचे व्यसन जडले होते. याबाबत त्यांच्या पालकांकडून वारंवार त्यांना समजही दिली जात होती; पण व्यसनापोटी त्यांनी कामही करणे सोडून दिले होते. घरकाम न करता इकडे तिकडे फिरणाऱ्या या दोघांना आई-वडिलांनी शुक्रवारी धारेवर धरले. मी घरकाम करणार नाही, तू कर, असे म्हणत दोघांमध्ये भांडण झाले. रात्री घरच्या वरच्या मजल्यावरील पायरीवर गांजाचे सेवन करण्यासाठी ते दोघेही गेले असता, पुन्हा या दोघांमध्ये घरकाम करण्यावरून वाद झाला. यावेळी दोघांमध्ये नशेतच वादावादी देखील झाली. त्या दरम्यान पायरीवरून तोल गेल्याने दोघेही खाली कोसळले. यात सुशांतच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ओंकार याचे पाय मोडले असून जखमी अवस्थेतील त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवून दिला. घटनेची नोंद मारिहाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta