Monday , December 8 2025
Breaking News

ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले. ते 97 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात दोन चिरंजीव प्रा. आनंद मेणसे, ऍड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, श्रीमती नीता पाटील व नातवंडे आहेत.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आज रात्री आठ वाजता सरस्वती नगर येथील निवासस्थानापासून त्यांचे अंत्ययात्रा निघणार आहे. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचा परिचय

बालपण : त्यांचा जन्म बेळगाव येथील शेतकरी कुटुंबात दि. ९ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मेणसे कुटुंब हे बेळगावचेच. घरी वारकरी परंपरा असल्यामुळे वारकरी संप्रदायाचे संस्कार बालवयात झाले. बालवयातच संत साहित्याची ओळखही झाली. शालेय शिक्षण बेळगावातच. शाळेत सत्यशोधक विचारांच्या शिक्षकांचा प्रभाव तसेच राष्ट्रीय चळवळीतून आलेल्या शिक्षकांचाही प्रभाव. माध्यमिक शिक्षण प्रथम मराठा मंडळ व त्यानंतर जी. ए. हायस्कूल येथे झाले.
राष्ट्रीय चळवळीतील सहभाग राष्ट्र सेवादलाच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. याच काळात बेळगावात भूमिगत राहण्यासाठी येणाऱ्या प्रतिसरकार चळवळीतील अनेकांना आश्रय देण्याचा काम तसेच त्यांच्या सभा आयोजित करणे, गुप्त बैठका आयोजित करणे ही कामे पार पाडली. या काळात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, बर्डे गुरुजी, जी. डी. बापू लाड यांचा परिचय, महात्मा गांधीनी दिलेल्या आदेशाला प्रतिसाद देत १९४६ मध्ये शिक्षणाचा त्याग करून थेट महात्मा गांधी यांच्या आश्रमात दाखल. तेथेच आचार्य विनोबा भावे यांची भेट. पुढे महात्माजींच्या आणि विनोबाजींच्या सल्ल्यानुसार घरी परतले व शिक्षणास पुन्हा प्रारंभ. मॅट्रीकची परीक्षा उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लिंगराज कॉलेजमध्ये प्रवेश. त्यानंतर आरपीडी कॉलेज येथे प्रवेश. दोन्ही महाविद्यालयांचे विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधीत्व. १९५१ साली स्थापन झालेल्या कर्नाटक विश्व विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रीय स्तरावर केले व कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याच काळात एक प्रभावी वक्ता म्हणूनही त्यांचा बोलबाला झाला. कुस्ती आणि वत्कृत्व ही दोन क्षेत्रे त्या काळात त्यांनी गाजवली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

महात्मा गांधींचे प्राण वाचविण्यात काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आल्यामुळे व ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करण्यास काँग्रेस नेते टाळाटाळ करताहेत हे पाहून त्यांनी विचारपूर्वक कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला व आजही ते त्या पक्षाचे सभासद आहेत. बेळगाव परिसरातील सामान्य माणसापासून कार्याला सुरुवात करण्याच्या उद्देशाने त्यांनी आदिवासी बेरड समाजाला संघटित करण्याचे काम केले. बेरड समाजाला शेती करण्यासाठी जमीन देण्यात यावी अशी मागणी केली. बेळगाव परिसरातील सर्वात दुर्दैवी आणि उपेक्षित अशा वेश्यांची संघटना त्यांनी केली व त्यांच्या पुनर्वसनाची मागणी शासनाकडे केली. त्या काळात असे करणे हे मोठे धाडसाचे होते. पण त्यांनी ते केले. हे करतानाच महात्मा फुल्यांचा सत्यशोधक विचार बहुजन समाजात रुजविण्याचे काम त्यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी दि. १० ऑक्टोबर १९५५ रोजी मुंबईत झालेल्या सत्याग्रहात बेळगाव परिसराचे प्रतिनिधीत्व करून स्वतःस अटक करवून घेतली. त्यांना सत्याग्रह केल्याबद्दल आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्यांचा आचार्य अत्रे, मधु दंडवते, सेनापती बापट यांच्याशी परिचय झाला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात सीमा आंदोलन सुरू झाले. १६ जानेवारी १९५६ रोजी भाषावार प्रांतरचना केंद्र सरकारने जाहीर केली व सीमाभाग कर्नाटकात घातला. त्याची संतप्त प्रतिक्रिया बेळगावात उमटली. १७ जानेवारी १९५६ साली जन आंदोलनास सुरुवात झाली. बेळगावात गोळीबार होऊन चारजणांना हौतात्म्य लाभले. या लढ्याचे नेतृत्व त्यांनी केले. यासाठी त्यांना केंद्र सरकारने स्थानबद्ध करून अकरा महिने तुरुंगात ठेवले. या अकरा महिन्याच्या कालावधीत त्यांना भारतातील निरनिराळ्या सातं तुरुंगात हलविण्यात आले. यामध्ये बेळगाव, नाशिक, मुंबई, दिल्ली येथील तुरुंगाचा समावेश आहे.

साराबंदी आंदोलन

सीमा आंदोलनाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बेळगाव परिसरातील शंभर गावातून साराबंदी आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात गुजराथमधील बारडोली येथे ज्या पद्धतीने साराबंदी आंदोलन झाले त्या पद्धतीने हे आंदोलन बेळगावात झाले. या आंदोलनाचे संघटक म्हणून त्यांनी काम पाहिले. पोलिसांनी जेव्हा शेतकऱ्यांच्या घरावर जप्तीचे वॉरंट बजावण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे भाई उद्धवराव पाटील यांच्या सोबत सत्याग्रह केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी भीषण मारहाण केली व तुरुंगात ठेवले सन १९७२ सालापर्यंत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जेवढी आंदोलने सीमाभागात झाली त्या सर्व आंदोलनातून सहभाग घेतला.

गोवा मुक्ती आंदोलनातील योगदान

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जेव्हा सुरू झाले त्याचकाळात गोवा मुक्ती आदोलनही सुरू झाले. गोवा मुक्ती आंदोलनाचे बेळगाव हे केंद्र झाले. या आंदोलनातही त्यांनी अग्रभागी राहुन कार्य केले. देशभरातूर बेळगावात येणान्या सत्याग्रहीची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे, सत्याग्रहींना सावंतवाडी येथे राहण्यासाठी मदत करणे, गोवा सरहद्दीवर मारहाणीत जखमी झालेल्या सत्याग्रहींना बेळगावात आणून इस्पितळात दाखल करणे, पुढे त्यांना त्यांच्या घरी पोहचण्यासाठी व्यवस्था करणे, गोळीबारात मरण पावलेल्या हुतात्म्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवणे ही सारी कामे त्यांनी केली. बेळगावात राहून गोवा मुक्तीसाठी कार्य करणान्या गोबन पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांना बेळगावात आश्रय देणे ही कामे त्यांनी केली.

कामगार चळवळीतील योगदान

असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर काम केले. यामध्ये प्रामुख्याने हटिल कामगार, विणकर कामगार, रिक्षावाले, हमाल, औद्योगिक कामगार यांचा समावेश होतो. बेळगाव येथे सत्तरच्या दशकात इंडियन अल्युमिनियम कंपनी (इंडाल) स्थापन झाली. या कंपनीच्या कामगप्ताचे नेतृत्व केले, तसेच देशभरात असलेल्या अल्युमिनियम कंपन्यांच्या कामगारांची मध्यवर्ती संघटना स्थापन करण्यात योगदान दिले. अल्युमिनियम प्रमाणेच सिमेंट उद्योगातील कामगारांना न्याय मिळावा म्हणून कर्नाटकातील सिमेट कामगारांचे फेडरेशन तयार केले. कर्नाटकातील विणकर कामगारांसाठी वेतन श्रेणी तयार करण्याचे काम शासनाने त्यांच्यावर सोपविले होते, ते त्यांनी पार पाडले. कर्नाटकातील खाण उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे अनेक लढे त्यांनी लहविले व त्यांना न्याय मिळवून दिला.

कम्युनिस्ट चळवळीतील योगदान

कम्युनिस्ट चळवळीत त्यानी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य केले. त्याबद्दल त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अनेकवेळा तुरुंगवास सहन करावा लागला, बेळगाव जिल्ह्याबरोबरच त्यांनी विजापूर, गुलबर्गा, रायचूर आणि बिदर या जिल्ह्यात पक्षाचे कार्य वाढविले. पक्षाच्या राज्य मध्यवर्ती समितीचे चिटणीस तसेच राष्ट्रीय समितीचे सभासद महणून त्यांनी दीर्घकाळ काम केले.

वाङ्मयीन कार्य आणि पत्रकारिता

कम्युनिस्ट चळवळीत काम करणे हे पूर्वी खूप कठीण असायचे. अशा परिस्थितीतही त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या साहित्याचे सतत वाचन केले. १९५९ साली साहित्याला बाहिलेले ‘हेमंत’ हे मासिक सुरू केले. अल्पावधीतच या मासिकाने लोकप्रियता मिळवली. या मासिकात बाबुराव बागुल, अण्णा भाऊ साठे, अमर शेख अशी लेखक मंडळी लिहीत असत. हे मासिक तीन वर्षे चालले. १९६२ साली त्यांना केंद्र सरकारने अटक करून तुरुंगात ठेवले त्यामुळे या मासिकाच्या प्रकाशनात खंड पडला. पुढे सीमा चळवळीत आपली भूमिका मांडण्यासाठी १५ ऑगस्ट १९६९ साली ‘साम्यवादी’ हे साप्ताहिक स्थांनी सुरू केले. जे आजही सुरू आहे. याबरोबरच विविध वृत्तपत्रात त्यांनी शेकडो लेख लिहिले.

प्रवास

पक्षकार्य आणि कामगार चळवळ या निमित्ताने देशभरात प्रवास.

१९७६ साली तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मास्को येथे दहा महिने वास्तव्य.

१९९७ साली जागतिक मराठी परिषदेच्या इस्त्राईल येथे झालेल्या अधिवेशनात भाग घेऊन इजिप्त, इस्त्राईल येथे प्रचाम

विधायक कार्य

कम्युनिस्ट चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विधायक कार्य केले पाहिजे याचा आग्रह.

१९७५ साली अन्नपूर्णा महिला मंडळ, मुंबई या संस्थेची स्थापना करण्यात सहभाग.

१९८४ मध्ये “दि बेळगाव सिटी मझदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.’ या सोसायटीची स्थापना करण्यात सहभाग

१९८८ मध्ये कॉ. कृष्णा मेणसे पुरोगामी व्यासपीठ या संस्थेची स्थापना करून प्रबोधन कार्य, शिबीर, चर्चासत्रे इ

१ मे १९८८ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते त्यांचा त्यांच्या षष्टब्धी निमित्त गौरव करून जमतेने १ लाख तीस हजार रुपयाची थैली अर्पण केली. ती त्यांनी प्रबोधन कार्यासाठी वापरा असे सांगून परत केली.

१६ ऑगस्ट २००३ साली त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी कॉ. ए. बी. बर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात त्यांना जनतेने जी रक्कम दिली ती त्यांनी पुन्हा प्रबोधन कार्यासाठी परत दिली.

प्रकाशित पुस्तके

१) असा आहे गोवा (१९५८)

२) गुरुवर्य शामराव देसाई बरित्र (१९६५)

३) गोठलेले धरती पेटलेली मने (१९७८)

४) अविस्मरणीय वीरगाथा अनुवात (१९७९)

५) परिक्रमा (१९८०)

६) निपाणी येथील शेतकऱ्यांचा लढा (१९८१)

७) दादा पुरव स्मृतिग्रंथ (संपादन १९८३)

८) कॉ. एस. एस. मिरजकर (चरित्र १९८७)

९) कॉ. नाना पाटील (चरित्र १९८७)

१०) इराक अमेरिका युद्ध (१९९१)

११) हो-चि-मिन्ह (चरित्र १९९२)

१२) अशा तोडल्या वेड्या (१९९५)

१३) बसवेश्वर ते ज्ञानेश्वर – एक चिंतन (१९९६)

१४) स्वातंत्र्य आंदोलन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (१९९७)

१५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी (१९९८)

१६) राणी कित्तूर चन्नम्मा (२०००)

१७) असा घडलो असा लढलो (२००३)

१८) बंधू भगिनींनो (२००७)

यातील बसवेश्वर ते ज्ञानेश्वर एक चिंतन या पुस्तकाचे कन्नड भाषेत भाषांतर झाले आहे.

पुस्तकांना मिळालेले पुरस्कार :

१) हो-चि-मिन्ह या पुस्तकास वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगावचा पुरस्कार – १९९४.

२) बसवेश्वर ते ज्ञानेश्वर – एक चिंतन या पुस्तकास पुणे विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार – १९९७. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार १९९७. कर्नाटक राज्य वीरशैव साहित्य परिषदेत या पुस्तकाचा गौरव.

३) गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने वाङ्मय सेवेसाठी दिला जाणारा पुरस्कार – १९९८.

४) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बेळगाव येथे साहित्य सेवेबद्दल गौरव – २०००.

५) येळ्ळूर मराठी ग्रामीण साहित्य संघाच्यावतीने साहित्यिक म्हणून गौरविण्यात आले. २००७.

६) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्यावतीने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव – २००७.

पत्रकारितेबद्दल मिळालेले पुरस्कार :

१) बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने त्यांच्या पत्रकारितेचा गौरव करून २००४ साली बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान.

इतर महत्त्वाचे पुरस्कार :

१) क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार – २००४

२) संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने गौरव – २००७

३) सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार – २००९

४) सरस्वती वाचनालय, बेळगावतर्फे देण्यात येणारा बेळगाव भूषण पुरस्कार – २०११

स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी करण्यात आलेला गौरव :

१) गोवा राज्य शासनाने स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरव केला. – १९८५

२) दिल्ली येथे झालेल्या गोवा स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात जॉर्ज फर्नांडीस यांच्या हस्ते गौरव – २०००

३) दिल्ली येथे झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या हस्ते गौरव – २०००

४) गोवा येथे झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात भैरवसिंग शेखावत यांच्या हस्ते गौरव २००४

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *