येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. आज सोमवार (ता. 13) रोजी दुपारी बारा वाजता सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांकडून सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामूहिकरित्या ओला व सुका नैवेद्य परड्यामध्ये भरला जातो. त्यानंतर सामूहिकरित्या ‘उदे ग आई उदे’ म्हणत यल्लमा देवीचा जयघोष केला जातो. महिला भगिनींना शिस्तबद्दरीत्या रांगेमध्ये बसवून परड्या भरण्याचा कार्यक्रम चांगळेश्वरी देवीचे पुजारी, मानकरी, गावची पंचमंडळी, चांगळेश्वरी देवी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक रित्या व अनोख्या पद्धतीने येळ्ळूरच्या भाविकांकडून हा परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन परड्या भरण्याचे दुर्मिळ चित्र भाविकांना पाहायला मिळते. याचे कौतुक डोंगरावरील भक्त व भाविकांकडून केले जाते. भाविक सौंदत्ती डोंगरावरून परत आल्यानंतर येळ्ळूर वेशीमध्ये शुक्रवार (ता. 17) रोजी मळ्यातील यात्रोत्सव होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta