बेळगाव : काँग्रेस सरकारने बिम्समधील आजच्या बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. तसेच सरकारी रुग्णालयात मृत झालेल्या सर्व गर्भवती महिला आणि नवजात बालकांना न्याय द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य महिला मोर्चा सचिव व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
बेळगावच्या बिम्स रुग्णालयामध्ये आज मंगळवारी पुन्हा एका महिलेला बाळंतपणानंतर आपला जीव गमवावा लागला. आम्ही वारंवार आंदोलने करूनही कर्नाटक काँग्रेस सरकारकडून पुरेशी खबरदारी आणि सुविधा पुरविल्या जात नाहीत. हे सरकार बिम्समध्ये नवीन सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याऐवजी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्यात धन्यता मानते ही खेदाची बाब आहे. बिम्स मधील आजच्या बाळंतिणीच्या मृत्यूची गंभीर दखल घेऊन कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. त्यांनी बिम्स सारख्या सरकारी रुग्णालयात मृत पावलेल्या सर्व गर्भवती -बाळंतीण महिला आणि नवजात बालकांना न्याय द्यावा, अशी माझी मागणी आहे, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले आहे.