बेळगाव : लेझिम आणि ढोल ताशांचा गजर, मराठमोळ्या पेहरावात सहभागी झालेले विद्यार्थी आणि पालक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड जयघोष अशा उत्साही गजाननराव भातकांडे शाळेतर्फे काढण्यात आलेली शोभायात्रा शहरवासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. तसेच शोभा यात्रेनंतर प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सूमधुर गायनालाही मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक जण त्यांच्या गाण्यावेळी थिरकताना दिसून येत होते.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करत असलेल्या विद्याप्रसारक मंडळाचे 55 वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्त मंगळवारी स्टेशन रोड पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते पूजन करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी शालेय विद्यार्थिनींचे ध्वज पथक होते. त्यानंतर ढोल ताशा आणि लेझीम पथक आपली कला सादर करीत मार्गक्रमण उत्साह निर्माण करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावात घोड्यावर स्वार झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी, मराठमोळ्या पेहरावात सहभागी झालेले पालक व विद्यार्थी तसेच शिवाजी महाराजांच्या अखंड जयघोष यामुळे हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, एसपीएम रोडवरून काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली.
शोभायात्रा झाल्यानंतर भातकांडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर बेला शेंडे यांनी अनेक गाजलेली गाणी सादर करून उपस्थित असलेल्या नागरिकांना थिरकण्यास भाग पाडले. त्यामुळे थंडीमध्येही अनेकानी कार्यक्रमाचा आनंद घेतला. मिलींद भातकांडे, सचिव मधुरा भातकांडे आदींनी स्वागत केले.