
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात काव्यसप्ताह कार्यक्रम, शिक्षक, पालक व विद्यार्थी कवी संमेलन, पुस्तक परीक्षण प्रात्यक्षिक, पुस्तक परीक्षण सादरीकरण, साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प सादरीकरण, एक दिवस वाचनासाठी, साहित्यिक भेट, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाची मुले, त्यांचे पालक व शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात मराठीचा अभिजात दर्जा व वास्तव स्थिती या विषयावर आरपीडी कॉलेजचे प्राध्यापक परसु गावडे यांनी मांडणी केली. त्यांनी आपल्या भाषणात बोलीभाषा व व्यावहारिक भाषा यांच्यामध्ये समन्वय राहिला तरच मराठी भाषा अभिजात बनेल असे वक्तव्य केले. तर मराठा मंडळचे इंग्रजीचे प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी सध्याच्या एआयचे शिक्षण व्यवस्थेत होणारे बदल, त्याचे गंभीर स्वरूप व वास्तव स्थिती याची मांडणी केली. त्यांनी एआयचे महत्त्व सांगताना शिक्षकांनी अपडेट असले पाहिजे ते जर अपडेट झाले तरच भविष्यात ते टिकतील असे भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले. इंद्रजीत मोरे यांनी प्रास्ताविक मांडले. सविता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन श्री. जयंत नार्वेकर व मालोजी अष्टेकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला सचिव सुभाष ओऊळकर, सुरेश गडकरी, नीला आपटे, प्रसाद सावंत, गजानन सावंत, नारायण उडकेकर व पालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन ज्योती महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका ज्योती मजुकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज चव्हाण यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta