
बेळगाव : प्रभाग समित्यांसाठी बेळगावकरांकडून प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिकेच्या घंटागाडीवरील ध्वनिक्षेपकावरून जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाचे सहायक कार्यकारी अभियंत हणमंत कलादगी यांच्यासोबत चर्चा करण्याची सूचना आयुक्त शुभा बी. यांनी दिली आहे.
प्रभाग समिती संघटनेचे पदाधिकारी अनिल चौगुले, विकास कलघटगी व आनंद आपटेकर यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी प्रभाग समित्यांच्या स्थापनेबाबत चर्चा झाली. संघटनेकडून यावेळी विविध प्रभागांतील १९ अर्जही दाखल केले. प्रभाग समित्यांसाठी आतापर्यंत दाखल झालेले अर्ज, कोणत्या प्रभागात किती अर्जाची गरज आहे, याबाबतची चर्चाही झाली. ज्या प्रभागांत महिलांकडून राखीव जागांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत, त्या प्रभागांत अतिरिक्त अजर्जाना सामान्य प्रवर्गात सामावून घेण्याची विनंती
आयुक्तांकडे केली. याआधी दाखल झालेल्या अर्जाबाबत जी समस्या निर्माण झाली आहे, ती समस्या सोडविण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी कौन्सिल विभागाला दिली. बेळगाव शहरात प्रभाग समित्यांची स्थापना केली जावी, यासाठी महापालिकेकडून चौथ्यांदा अर्ज मागविले आहेत. यावेळी प्रभाग समित्यांसाठी आवश्यक अर्ज दाखल व्हावेत, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे. आयुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तरी नागरिकांकडून अर्ज दाखल होणे आवश्यक आहे. यावेळी नागरिक महापालिकेत जाऊन अर्ज घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta